विरोधकांचीच परीक्षा; अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा उत्तरार्ध आजपासून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वार्धाच्या समाप्तीवेळी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांत सत्ताधारी भाजपला फटका बसेल अशा आत्मविश्वासात वावरणाऱया विरोधकांचा निवडणूक निकालाने पुरता भ्रमनिरास झाल्याने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उत्तरार्धात सरकारऐवजी आता विरोधकांचीच परीक्षा असणार आहे. वित्तविधेयकावर मंजुरीची मोहोर उमटवल्यानंतर 8 एप्रिलला अधिवेशनाची सांगता होईल.

पाच राज्यांतील निवडणुकांच्या तोंडावर मोदी सरकारने वादग्रस्त कृषी कायदे मागे घेतले. विधानसभा निवडणुकीत भाजपचे पानिपत होईल असेच वातावरण होते. त्यामुळे विरोधकांनीही अधिवेशनाचा पूर्वार्ध गाजवला. मात्र  निवडणूक निकालांमुळे सत्ताधारी भाजपला बूस्टर डोस मिळाला आहे तर विरोधकांचे मात्र अवसान गळाले आहे. अशा स्थितीत गलितगात्र झालेले विरोधक सरकारला कसे धारेवर धरतात याकडे सर्वांचे लक्ष असेल.

निवडणूक निकालानंतर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षात मोठय़ा घडामोडी घडत आहेत. त्यात भाजपविरोधात राष्ट्रव्यापी आघाडी उभी करण्याच्या प्रयत्नांनादेखील या निकालांनी मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे विरोधकांचा एकजिनसीपणा या अधिवेशनात दिसेल काय, हाही एक प्रश्न आहे.

महागाई, बेरोजगारी, युक्रेनमधील विद्यार्थ्यांचे प्रश्न

अधिवेशनाच्या उत्तरार्धात काँग्रेस पक्ष महागाई, बेरोजगारी तसेच युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचा मुद्दा लावून धरेल, अशी माहिती राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली.

राज्यसभेला कामकाजाचे अतिरिक्त 19 तास मिळणार

अधिवेशनाच्या उत्तरार्धात राज्यसभेला कामकाजाचे अतिरिक्त 19 तास मिळणार असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली. सकाळी 11 ते सांयकाळी 6 वाजेपर्यंत राज्यसभेचे कामकाज चालण्याची शक्यता आहे.