फडणवीस पेनड्राइव्ह म्हणजे नुरा कुस्ती! – प्रकाश आंबेडकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांना सोपविलेला पेनड्राइव्ह म्हणजे त्यांची ही नुरा कुस्ती आहे. त्यांना खरेच मैदानी कुस्ती दाखवायची असेल, तर त्यांनी त्यांच्याकडे असलेले 120 तासांचे रेकार्ंडग जनतेसमोर दाखवावे,’ असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिले. नगर येथे वंचित आघाडीच्या मेळाव्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत हेते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘हिजाब’बाबत कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय काहीसा वेगळा येत आहे. सरकार नव्हे, तर विद्यापीठ किंवा महाविद्यालयाने घेतलेला निर्णय अंतिम असू शकतो. मात्र, हिजाबबाबत कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय पूर्ण पाहिल्यावर त्यावर बोलणे ठीक राहील. महाविद्यालयांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्यपालांचा असतो. कारण ते विद्यापीठाचे कुलपती असतात. तसेच महाविद्यालयेही काही निर्णय घेऊ शकतात. मुस्कान शिकत असलेल्या ठिकाणी हिजाबबाबत असा निर्णय झाला असेल, तर तो मान्य करणे क्रमप्राप्त आहे. मात्र, कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात म्हणून तसा अधिकार त्यांना नसल्याचा अभिप्राय आंबेडकर यांनी दिला.

याबाबत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे काही दाखले दिले, ज्यात सरकारऐवजी राज्यपाल आणि महाविद्यालयांना विद्यार्थ्यांबाबत अधिकार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, ‘कर्नाटक न्यायालयाचा निर्णय पाहता, मुंबई आणि कर्नाटक निर्णयांची ही दोन टोके म्हणावी लागतील,’ असे आंबेडकर म्हणाले. ‘ड्रेसकोडबाबत राज्य सरकार मार्गदर्शन करू शकते; पण ते बंधनकारक नसते,’ असेही ते म्हणाले.