
राष्ट्रीय महामार्गाच्या कामासंदर्भात भूसंपादन करून संबंधितांना पैसे देऊनही जागा खाली न केल्याप्रकरणी आज केडगाव बायपास महामार्गावरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी तसेच कोतवाली पोलीस ठाण्याचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
नगर जिह्यामध्ये राष्ट्रीय व राज्य महामार्गाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग दोन टप्प्यांमध्ये जोडला जाणार आहे. एक सुरत-हैदराबाद असा महामार्ग आहे, तर दुसरा कल्याण-विशाखापट्टणम हा नॅशनल हायवे तयार होत आहे. सध्या विळद घाट ते सारोळा बत्तीन असे काम सुरू आहे. या महामार्गावर रस्ता रुंदीकरण होत आहे. दुसरीकडे नगर जिह्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाचे सुमारे 150 किलोमीटरचे काम पहिल्या टप्प्यामध्ये हाती घेण्यात आले आहे. राहुरीतील शेतकऱयांनी जमीन देण्यास नकार दिला होता. त्या संदर्भात बैठका घेण्यात येत आहेत. मात्र, पैसे अदा केलेलेही जमिनीचा ताबा देत नसल्याचे समोर आले आहे. तिथे कोणत्याही प्रकारची अडचण नाही, असे असतानादेखीलसुद्धा जमिनी मोकळ्या होत नाहीत, अशी उदाहरणे आहेत. या रस्त्यामध्ये सुमारे 70 जणांची जमीन संपादित होणार आहे. त्यांना त्याचा मोबदलाही देण्यात आलेला आहे. पैसे देताना त्यांनी अतिक्रमण हटविण्यासाठी नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र, त्यांनी अतिक्रमण हटविले नव्हते. प्रशासनाने आजपासून केडगाव बायपास येथून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केलेली आहे.

























































