रस्त्यांचे काम ‘सीसीटीव्ही लाइव्ह’ करणे बंधनकारक; दर्जेदार कामासाठी पालिकेचा कंत्राटदारावर वचक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील रस्त्यांची कामे करतानाचे थेट प्रक्षेपण सीसीटीव्हीच्या माध्यमातून पालिका प्रशासनाकडे करणे आता कंत्राटदारांना बंधनकारक करण्यात येणार आहे. मुंबईकरांना दर्जेदार रस्ते मिळावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या सीसीटीव्हीची व्यवस्थाही संबंधित कंत्राटदारालाच करावी लागणार आहे. रस्ते व वाहतूक प्रमुख अभियंता उल्हास महाले यांनी ही माहिती दिली.

मुंबईत पालिकेचे सुमारे दोन हजार किमीचे रस्ते आहेत. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम पालिका कंत्राटदाराच्या माध्यमातून करते. मात्र काही वेळा कंत्राटदाराच्या माध्यमातून निकृष्ट काम केले जात असल्यामुळे नागरिकांना विशेषतः पावसाळ्यात मनःस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे कोटय़वधी रुपये खर्च करूनही पालिकेला टीकेचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून पालिकेने कंत्राटदारांच्या बेजबाबदारपणाला चाप लावण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यात आणखी सुधारणा करीत आता कंत्राटदारांना त्यांच्या कामाचे ‘लाइव्ह सीसीटीव्ही’ प्रक्षेपण पालिका प्रशासनाला देणे बंधनकारक करण्यात येणार आहे. यामुळे कंत्राटदार पालिकेच्या निकषाप्रमाणे काम करीत आहे का यावर मुख्य कार्यालयातूनही नजर ठेवता येणार आहे. त्यामुळे कामाचा दर्जा राखला जाणार आहे.

अशी आहे कंत्राटदारांवर जरब

रस्त्यांच्या दर्जावर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेने नुकतीच  एकूण सात परिमंडळांसाठी 8 गुणवत्ता व्यवस्थापन संस्थांची नियुक्ती केली आहे. परिमंडळ 1 ते 6 साठी प्रत्येकी एक आणि 7 साठी दोन संस्थांची नेमणूक केली आहे. सुमारे दोन वर्षांच्या कालावधीसाठी ही नेमणूक केली आहे.

कंत्राटदार आखून दिलेल्या निकषाप्रमाणे काम करत आहेत का नाही, यावर या संस्था लक्ष ठेवणार आहेत. काम होत असतानाच त्यात काही त्रुटी आढळल्यास त्या दाखवून त्यात सुधारणा करणे शक्य होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना अधिक दर्जेदार रस्ते मिळणार आहेत.

असे होतेय काम

मुंबईत छोटे-मोठे मिळून सुमारे दोन हजार किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. पैकी आजमितीस जवळपास एक हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झालेले आहे. या वर्षीदेखील पालिकेने जवळपास 200 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे.