
कुडाळ तालुक्यातील कर्ली खाडीकिनारी अनधिकृत वाळू उत्खनन करण्यासाठी उभारण्यात आलेल्या रॅम्पवर शुक्रवारी महसूल विभागाच्या पथकाने बेधडक कारवाई केली. या कारवाईत सरंबळ, सोनवडे, नेरूरपार, चेंदवण व कवठी आदी भागात सुमारे 55 ते 60 रॅम्प महसूल पथकाने जेसीबीच्या सहाय्याने तोडले. आतापर्यंतची ही मोठी कारवाई आहे. दरम्यान अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतुकीवर यापुढील काळातही बेधडक कारवाईची मोहीम सुरूच राहणार असल्याची माहीती महसूल विभागाच्या पथकाकडून देण्यात आली.
कर्ली खाडी किनारी बेकायदा वाळू उपसा करण्यासाठी बांधण्यात आलेल्या रॅम्पवर तहसीलदार अमोल पाठक यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाच्या पथकाने दिवसभर बेधडक कारवाईची मोहीम राबवली. या कारवाईत सरंबळ येथे 12, सोनवडे 15, नेरूरपार 12, कवठी 10 व चेंदवण 8 अशा सुमारे 55 ते 60 रॅम्प जेसीबीच्या सहाय्याने तोडून, साहित्य नदीपात्रात फेकून देण्यात आले, अशी माहीती महसूल विभागाच्या पथकाकडून देण्यात आली. तहसीलदार अमोल पाठक यांच्या उपस्थितीत ही कारवाईची मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत मंडळ अधिकारी संतोष गुरखे, चेंदवण तलाठी के.एस.सोनवणे, सरंबळ तलाठी प्रशांत मसुरकर, वालावल तलाठी आर.एस.खंडागळे, चेंदवण कोतवाल सुभाष जाधव आदींनी सहभाग घेतला. या कारवाईने वाळू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.


























































