किमान वेतन न देता कामगारांची वेठबिगारी पिळवणूक, वखार महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे ठेकेदाराविरोधात उपोषण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

राज्य वखार महामंडळाच्या अखत्यारीत येणार्‍या येथील सेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशनमध्ये ठेकेदाराकडून सफाई कामगारांचे पिळवणूक सुरू आहे. किमान वेतनही न देता वेठबिगारी पद्धतीने राबवून घेतले जात असल्याने कामगारांनी आजपासून लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली.

उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोडमध्ये महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे सीएफएस आहे. या सीएफएसमध्ये क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस या कंपनीला विविध प्रकारची ठेकेदारी पद्धतीवर कामे दिली आहेत. यामध्ये सफाईच्या कामाच्या ठेक्याचाही समावेश आहे. मागील काही वर्षांपासून काम करीत असलेल्या सफाई कामगारांच्या विविध मागण्यांवर व्यवस्थापनाकडून सातत्याने दुर्लक्ष केले आहे. यामुळे कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी न्यू मेरिटाइम अ‍ॅण्ड जनरल संघटनेचे सरचिटणीस वैभव पाटील, उपाध्यक्ष किरीट पाटील यांनी आजपासून लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली आहे. आंदोलनाची दखल घेत महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ सीएफएसचे डेप्युटी जनरल मॅनेजर किसनराव टोपे यांनी तातडीने कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत ठेकेदाराकडून खुलासा मागवला जाईल, असे आश्वासन दिले.

अशी होते आर्थिक लूट

ठेकेदाराने कर्मचार्‍यांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरलेली नाही. कामगार विमा योजनेचाही कामगारांना लाभ दिला नाही. गेल्या पाच वर्षांपासून कामगारांना वेतनवाढ मिळालेली नाही. किमान वेतनही कामगारांना दिले जात नाही.