
हिंदुस्थानचा शेजारी देश पाकिस्तानात मोठी राजकीय उलथापालथ सुरू असून, पंतप्रधान इम्रान खान यांचीच हिट विकेट पडणार अशी दाट शक्यता आहे. स्वपक्षातील बंडखोरी आणि मित्रपक्षांनी काढलेला पाठिंबा यामुळे सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळे 3 एप्रिलच्या अविश्वास ठरावापूर्वीच इम्रान खान राजीनामा देतील असा अंदाज आहे.
वेगवान गोलंदाज म्हणून क्रिकेट जगतात प्रसिद्ध असलेले इम्रान खान 2018 मध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान बनले. मात्र, त्यांना पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता येणार नाही हे स्पष्ट झाले आहे.
त्यांच्याविरुद्ध स्वपक्षात पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफमध्ये (पीटीआय) मोठा असंतोष असून, मित्र पक्षांनीही साथ सोडली आहे. पाकिस्तान संसदेत 342 सदस्य आहेत. बहुमतासाठी 172 जणांचा पाठिंबा आवश्यक आहे. सध्या इम्रान यांच्या पीटीआय पक्षाचे 155 खासदार आहेत. त्यातील 24 जणांनी बंडखोरी केली आहे. मित्रपक्ष मुत्तेहिदा काwमी मूव्हमेंट पाकिस्तान (एमक्युएम-पी) आणि बलुचिस्तान आवामी पार्टीने सरकारचा पाठिंबा काढला आहे. त्यामुळे इम्रान खान राजीनामा देणार असल्याचे वृत्त आहे.
सर्व विरोधक एकवटले
इम्रान खान सरकारविरोधात सर्व विरोधक एकवटले आहेत. पीएमएल-एन पक्षाचे अध्यक्ष शाहबाज शरीफ आणि बिलावल भुत्तो यांच्या पाकिस्तान पिपल्स पार्टीने संसदेत अविश्वास ठराव मांडला आहे. 3 एप्रिल रोजी या ठरावावर मतदान होईल. मात्र, तत्पूर्वीच इम्रान खान पंतप्रधानपद सोडतील अशी चर्चा आहे.
शाहबाज शरीफ पंतप्रधान होणार की मार्शल लॉ?
पाकिस्तानात आतापर्यंत एकही पंतप्रधानाने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. लष्कराने अनेकदा बंड करून ताबा घेतला आहे. त्यामुळे इम्रान यांच्या राजीनाम्यानंतर विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ पुन्हा पंतप्रधान होणार की लष्करी राजवट अर्थात मार्शल लॉ लागू होणार हे लवकरच स्पष्ट होईल. शाहबाज हे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे भाऊ असून, नवाज सध्या तुरुंगात आहेत.



























































