
- रंगनाथ कोकणे
गेल्या काही दिवसांत जगभरात कीटकांविषयी झालेल्या अध्ययनांचे आणि संशोधनांचे निष्कर्ष आणि आकडेवारी धक्कादायक आहे. कीटक आणि पतंगांच्या अनेक प्रजाती या जगातून नामशेष होत आहेत, असे तज्ञांचे म्हणणे आहे. जगभरातील शेती बऱ्याच अंशी कीटक आणि पतंगांवर अवलंबून असते. हे छोटेसे जीव आपल्या जैवविविधतेसाठी आणि संपूर्ण परिस्थितीसाठी आत्यंतिक गरजेचे आहेत.
प्रत्येकाने फक्त एकच प्रश्न स्वतःला विचारून पाहावा. आपल्या अवतीभोवती फिरणारे फुलपाखरू आपण अखेरचे केव्हा पाहिले होते? आणखीही एक प्रश्न आपण स्वतःला विचारू शकतो तो असा की, फुलावर बसलेली मधमाशी आपण पाहिली होती, त्याला किती दिवस झाले? आपण जर एखाद्या मोठय़ा शहरात किंवा महानगरात राहत असू तर या प्रश्नाचं उत्तर अगदीच सोपं आहे- खूप वर्षे झाली! जर आपण छोटय़ा शहरातील रहिवासी असू तर उत्तर असेल – काही महिन्यांपूर्वी! जर आपण गावात राहत असू तर उत्तर असेल- हल्ली फुलपाखरे फारशी दिसत नाहीत! ही तीन उत्तरे म्हणजे विविध भौगोलिक परिसरांमधील जैव आणि नैसर्गिक विविधतेमध्ये आलेल्या बदलांचे वर्णन असून, त्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. प्रकाशमान झालेल्या काजव्याचे दर्शन कधी झाले होते, असे जर आपण 20-21 वर्षांच्या एखाद्या तरुणाला विचारले तर त्याचे उत्तर असेल- कधीच पाहिले नाही! वरवर पाहता हे प्रश्न अगदी किरकोळ वाटतील. कदाचित, हे प्रश्न विचारलेच जाता कामा नयेत असेही वाटेल, परंतु वास्तव असे आहे की, हे प्रश्न आत्यंतिक महत्त्वाचे आहेत. हे प्रश्न अशा सर्व किडय़ा-मकोडय़ांशी संबंधित आहेत, ज्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. कीटक आपल्या पर्यावरणासाठी आणि परिस्थितीसाठी आत्यंतिक गरजेचे आहेत, म्हणूनसुद्धा हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत.
काही दशकांपूर्वी छोटी शहरे आणि निमशहरी भागात तलाव आणि पाण्याच्या अन्य स्रोतांजवळ ड्रगन फ्लाय म्हणजे चतुर दिसणे अगदी सामान्य मानले जात असे. त्यांना पाहून मुलांना खूप आनंद होत असे, परंतु आज पाण्याचे स्रोतच संपत चालले आहेत आणि ड्रगन फ्लाय कुठेच दिसत नाहीत. मधमाश्या आणि रंगबेरंगी फुलांभोवती गुंजन करणारे भुंगेही आता वर्षानुवर्षे दिसत नाहीत. असे अनेक कीटक जगातून लुप्त होत चालले आहेत. आपल्या आसपास असणारी ही सृष्टी जणू अचानक गायब झाली आहे. ही वाटचाल वर्षानुवर्षे तशीच सुरू आहे. आपण सातत्याने निसर्गाकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळेही असे घडत आहे. कीटकांची स्वतःची अशी एक स्वतंत्र दुनिया आहे. जैवविकासाच्या प्रक्रियेत कीटक ही खूप जुनी जीवसंरचना आहे. लाखो-कोटय़वधी वर्षांच्या विकासाच्या प्रक्रियेत कीटक आणि पतंगांनी मानवासोबत राहणे स्वीकारले आहे; शिकले आहे.
काही कीटक आपल्या आसपास राहतात तर काही कीटक आपल्यापासून दूर निर्जन स्थळी वाढतात. काही दिवसांपूर्वी जगभरातील कीटकांवर करण्यात आलेल्या संशोधनाचे निष्कर्ष आणि आकडेवारी थक्क करणारी आहे. कीटक आणि पतंगांच्या अनेक प्रजाती या जगातून नामशेष होत आहेत, असे तज्ञांचे म्हणणे आहे. जलवायू परिवर्तन, निसर्गाचा ऱहास आणि वाढता मानवी हस्तक्षेप यासाठी प्रामुख्याने कारणीभूत ठरला आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्जर्वेशन ऑफ नेचरने (आययूसीएन) केलेल्या संशोधनातून असे आढळून आले आहे की, जगभरात पाचातील एक ड्रगन फ्लाय, डॅमफ्लाय आणि अन्य कीटकांवर अस्तित्वाचे संकट पसरले आहे. ते विलुप्त होण्याच्या उंबरठय़ाशी आहेत. त्यांच्या प्रजननासाठी आणि विकासासाठी आवश्यक असे गोडय़ा पाण्याचे स्रोत संपुष्टात आले आहेत. या कीटकांच्या सुमारे 16 प्रजाती नष्ट होण्याच्या बेतात आहेत, असा अंदाज आहे.
अनेक पक्षी असे आहेत, ज्यांच्या पिलांना सुरुवातीच्या काळ्यात किडेमकोडे हेच एकमेव अन्नाचे साधन असते. अशा परिस्थितीत जर कीटक नष्ट झाले तर पक्ष्यांच्याही अनेक प्रजाती नष्ट होऊ शकतील. असे झाले तर आपल्या शेतांचे आणि झाडांचे प्रचंड नुकसान करणारे टोळ आणि तत्सम अन्य कीटक प्रचंड प्रमाणात वाढतील. अलीकडील वर्षांत राजस्थान, पंजाबपासून मध्य प्रदेशातील अनेक भागांपर्यंत टोळधाडींनी ज्या प्रचंड संख्येने हल्ले केले, तो चर्चेचा विषय ठरला होता. एकंदरीने पाहता सृष्टीचे संतुलन कायम राखण्याच्या यंत्रणेत कीटकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. आता जर कीटकांच्याच अस्तित्वापुढे प्रश्नचिन्ह उभे असेल तर आपण काय करायचे, हा मुख्य सवाल आहे. या प्रश्नाचे सोपे उत्तर असे की, आपण आपल्या भोवतालच्या कीटकांबाबत जागरूक बनले पाहिजे. अत्यंत धोकादायक अशा डेंग्यू आणि मलेरियाच्या डासांना कोळी आपल्या जाळ्यात अडकवतो आणि आपला बचाव करतो, याचा विचार आपण केला पाहिजे. डासांचे निर्मूलन करण्यासाठी आपण जी विविध उत्पादने वापरात आणतो त्यामुळे मरणाऱ्या डासांच्या कितीतरी अधिक पटींनी डासांना कोळी फस्त करतात.
हे छोटेछोटे जीव केवळ कचराच साफ करतात असे नाही, तर आपण जे अन्नधान्य, फळे, भाजीपाला खातो, त्या उगवण्यात आणि त्यांच्या विकासात कीटकांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. आपण जर गांभीर्याने विचार केला तर आपल्याला असे दिसून येईल की, वस्तुतः आपल्या पिकांना माती, पाणी, खते, जंतुनाशके एवढेच पुरेसे नसते तर जीवनचक्र निरंतर फिरते ठेवण्यासाठी त्यांना कीटकांनी महत्त्वाची भूमिका बजावणेही आवश्यक असते. जाणकारांच्या मते, जगातील शेतीचा एक मोठा हिस्सा कीटकांवर अवलंबून आहे. हे छोटेसे जीव आपल्या जैवविविधतेसाठी आणि संपूर्ण परिस्थितिकीसाठी आत्यंतिक गरजेचे आहेत. निसर्गाच्या संपूर्ण चक्राचे संतुलन कायम राखण्यासाठी या जिवांची भूमिका आत्यंतिक महत्त्वाची आहे, परंतु आज या कीटकांच्या अस्तित्वावर मोठे संकट आले असताना आपण खूपच सजग होण्याची वेळ आली आहे.
निसर्गाला सुरक्षित करण्याच्या प्रयत्नांना वेग आणल्याने आणि गांभीर्यपूर्वक ठोस प्रयत्न केल्यानेच कीटकांची रंगबेरंगी दुनिया आपले अस्तित्व कायम राखू शकेल. फुलपाखरे असोत वा टोळ असोत, सर्वांच्या जीवनाला महत्त्व आहे. निसर्गाने सर्वांना कामे नेमून दिलेली आहेत, परंतु आपण आधुनिकतेच्या प्रवाहात केवळ निसर्गाचे संतुलनच बिघडवले असे नाही तर आता या जिवांचे अस्तित्वही संपुष्टात आणण्याच्या प्रयत्नात आपण आहोत. या जिवांना आपण लहानपणी बऱ्याचदा बघितले आणि त्याचा आनंदही घेतला. आता येणाऱ्या पिढीसाठी हे जीव आपल्याला जपून ठेवावे लागतील, जेणेकरून पुढील पिढय़ाही निसर्गातील हे सौंदर्य पाहण्याचा आनंद घेऊ शकतील.
दोन वर्षांपूर्वी ‘सायन्स’ या नियतकालिकाचा हवाला देऊन ‘डाऊन टू अर्थ’ या नियतकालिकात एक अहवाल सादर करण्यात आला होता. 1990 नंतर जगभरात कीटकांच्या संख्येत वेगाने घट झाल्याचे या अहवालात म्हटले होते. गोडय़ा पाण्याच्या स्वच्छ स्रोतांजवळ वाढणाऱ्या कीटकांच्या संख्येत सर्वाधिक घट झाल्याचे त्यात म्हटले होते. जर आपल्या परिस्थितिकीय यंत्रणेत कीटक नसतील तर काय होईल? हे जग खरोखर आपल्याला राहण्यायोग्य राहणार नाही. कीटक हे निसर्गातील सफाई कर्मचारी आहेत. ते राहिले नाहीत तर सर्वत्र आत्यंतिक दुर्गंध आणि सडलेल्या, कुजलेल्या वस्तू पडलेल्या दिसून येतील. एवढेच नव्हे तर अनेक प्रकारचे धोकादायक सूक्ष्मजीव मानवावर, पशूंवर आणि झाडाझुडपांवर हल्लेही करू लागतील. आपल्याला अशा वातावरणात खरोखर राहायचे आहे का? झाडांचे परागीभवन आणि प्रजनन यासाठी कीटक आणि पतंगांचे असणे अत्यंत आवश्यक आहे. हे छोटे जीव राहिले नाहीत तर वनस्पतींच्याही अनेक प्रजाती नष्ट होतील. त्यामुळे शाकाहारी जीवजंतूंची अन्नसाखळी तर विचलित होईलच, शिवाय सर्वच जिवांसमोर प्राणांचे संकट उभे राहील. वनस्पतींसाठी धोकादायक असलेल्या परजिवींना खाण्याचे कामही अनेक कीटक करत असतात. हे परजिवीही अनेक प्रकारच्या धोकादायक सूक्ष्मजीवांचा सफाया करत असतात.
(लेखक पर्यावरण अभ्यासक आहेत.)




























































