
केवायसी अपडेटच्या नावाखाली रेल्वे सुरक्षा बलाच्या हेडकॉन्स्टेबलची फसवणूक करणाऱया जामताराच्या मास्टरमाईंडलाच रेल्वे गुन्हे शाखेच्या भाईंदर युनिटने अटक केली. विक्रम राधेश्याम मंडल असे त्याचे नाव आहे. सायबर गुन्ह्याच्या तपासासाठी पहिल्यांदाच रेल्वे गुन्हे शाखेचे पथक जामतारा येथे गेले आहे.
मार्च महिन्यात हेडकॉन्स्टेबल हे लोकलने प्रवास करत होते. प्रवासादरम्यान विक्रमने हेडकॉन्स्टेबल यांना फोन करून केवायसी अपडेटच्या नावाखाली भीती घातली. प्रोसेस फी म्हणून 10 रुपये पाठवण्यास सांगितले. पैसे पाठवल्यानंतर विक्रमने आणखी एक लिंक पाठवून हेडकॉन्स्टेबलच्या बँक खात्याची माहिती घेऊन 98 हजार रुपये काढले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हेडकॉन्स्टेबलने वसई रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेतली. वसई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. याचा समांतर तपास रेल्वे गुन्हे शाखेचे भाईंदर युनिट करत होते. फसवणूक करणारे हे जामताराला असल्याची माहिती मिळाली. नक्षलवादी भागातून आरोपीला अटक करून मुंबईत आणायचे असल्याने ही मोहीम जिकिरीची होती. कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर जामतारा येथे हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक ए. शेख यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक बाबा चव्हाण, मल्ला, पुरी, निकम, भामरे, जयश्री दळवी आदींनी तपास सुरू केला. स्थानिक पोलिसांच्या मदतीने कालाघेरिया या नक्षलवादी गावातून विक्रमला ताब्यात घेतले. त्याने फसवणूक केल्याची कबुली पोलिसांना दिली. विक्रमला ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणले जात आहे.
जंगलातून करायचा फोन
विक्रम हा पदवीधर असून झटपट श्रीमंत होण्यासाठी तो फसवणूक करू लागला.फसवणुकीचे फोन करण्यासाठी विक्रम हा नक्षलवादी राहत असलेल्या जंगलात जात असायचा अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चार मोबाईल आणि 13 सिम कार्ड जप्त केले आहेत. फसवणुकीच्या रकमेतून विक्रमने आलिशान घर बांधून काही जमिनी विकत घेतल्याचे तपासात समोर आले आहे. त्याला फसवणुकीचे फोन करण्यासाठी डेटा कोण देत आहे याचा तपास रेल्वे गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत.



























































