नगर – शाळांच्या वेळा कमी करण्याबाबत आज निर्णय? वाढत्या उन्हामुळे जिल्हापातळीवर निर्णय घेण्याचे शिक्षण आयुक्तांचे निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत कमाल तापमानाचा पारा वाढला आहे. पुढील तीन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येणार असून, हवामान विभागाने 12 जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी केला आहे. यामुळे काही दिवस विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळांची वेळ कमी करण्याचा निर्णय जिल्हा पातळीवर घेण्याची सूचना शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी केली आहे. दरम्यान, यलो अलर्ट दिलेल्या 12 जिल्ह्यांत नगर जिल्ह्याचा समावेश असून, सोमवारी जिल्हाधिकाऱयांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी सांगितले.

हवामान विभागाने 12 जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी केला असून, यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, उत्तर महाराष्ट्रातील नगर, जळगाव तर नागपूर, चंद्रपूर, भंडारा, अकोला या जिल्ह्यांचा समावेश आहे. या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळेची वेळ कमी करण्याबाबत शिक्षण आयुक्त मांढरे यांनी शिक्षणाधिकाऱयांना सूचना दिल्या आहेत.

सध्या सुरू असलेल्या उष्णतेच्या प्रचंड लाटेमुळे इयत्ता 5 वी ते 9 वीची शाळेची सध्या सुरू असलेली सकाळी 7.30 ते दुपारी 12. 30 या वेळेत बदल करून ही वेळ दुपारी 12.30 ऐवजी 10.30 ते 10.45 अशी करण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. याबाबत शिक्षण विभागाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने बदल करावा, अन्यथा याबाबत पालकांना वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा पालकांच्या वतीने देण्यात आला आहे.

याच पार्श्वभूमीवर संबंधित शिक्षणाधिकाऱयांनी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकाऱयांशी चर्चा करून जिल्हा स्तरावर निर्णय घेण्याची सूचना शिक्षण आयुक्त मांढरे यांनी केल्या आहेत. त्यानुसार उद्या शाळांच्या वेळा कमी करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

ऐन उन्हात शाळा सुटत असल्याने मुलांची दमछाक

उष्णतेचा पारा 44 अंशावर गेला असताना दुपारी साडेबारा वाजता तळपत्या उन्हात मुलांची शाळा सोडण्यात येत आहे. शाळा सुटल्यानंतर रणरणत्या उन्हात वाडय़ावस्त्यांवरील लहान मुला-मुलींना घरी जावे लागते. काही सायकलवर तर काहींना पायी जावे लागते. यामुळे मुलांची पुरती दमछाक होऊन उन्हाचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. उन्हामुळे अनेक मुले तापाने फणफणली आहेत. अनेकांना डोकेदुखीसारखे आजार सुरू झाले आहेत. यामुळे पालकवर्गात चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे भरदुपारी शाळा सोडण्याचा निर्णय हा लहान मुलांवर अन्यायकारक असल्याचे पालकांचे मत आहे.