
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मंगळवारी ठाण्यात उत्तरसभेचे आयोजन करण्यात आले होते. हीच सभा आता राज ठाकरे यांना अडचणीत आणताना दिसत आहे. कारण राज ठाकरे यांच्यासोबत मनसे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांच्यासह 7 ते 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज ठाकरेंचे भाषण सुरु होण्याआधी मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मंचावर राज ठाकरेंचा सत्कार केला. या सत्काराच्या वेळी राज ठाकरेंच्या हातात तलवार देण्यात आली. राज ठाकरेंनी ही तलवार हातात घेत ती म्यानातून बाहेर काढून दाखवली. याच पार्श्वभूमीवर जाहीर कार्यक्रमात सार्वजनिक ठिकाणी तलवार दाखवल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्कार करताना दिलेली तलवार म्यानातून काढून उंचावून दाखवल्याने भारतीय हत्यार कायदा 1959 चे कलम 4 व 5 नुसार नौपाडा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
ठाण्यातील सभेचे आयोजक अविनाश जाधव, रवींद्र मोरे आणि राज ठाकरे यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी तलवार दाखवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे नौपाडा पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
























































