डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामास मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दादरच्या इंदू मिलमधील ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामास मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. स्मारकामधील इमारतींचे काम 49 टक्के पूर्ण झाले असून पुतळय़ाच्या चबुतऱयाचे काम सहा टक्के पूर्ण झाले आहे अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीए प्रशासनाकडे याबाबत माहिती विचारली होती. स्मारकाच्या सुधारीत संकल्पनेनुसार 1 हजार 89 कोटी 95 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 209 कोटी 53 लाख रुपये अदा करण्यात आले आहेत. आतापर्यंत प्रकल्पातील एकूण 209 कोटी 53 लाख रुपये 23 नोव्हेंबर 2021 रोजी अदा करण्यात आले आहेत. यात आगाऊ रक्कम म्हणून 31 कोटी 65 लाख रुपये व प्रकल्प सल्लागाराच्या शुल्कापोटी 12 कोटी 68 लाख रुपयांचा समावेश आहे. या प्रकल्पाचे पंत्राटदार मेसर्स शापूरजी पालनजी तर प्रकल्प सल्लागार शशी प्रभू असोसिएट्स आणि डिझाईन असोसिएट्स आयएनसी आहेत. 9 फेब्रुवारी 2018 रोजी कार्यादेश जारी करण्यात आला असून 36 महिन्यांत काम पूर्ण होणे अपेक्षित होते.

n प्रकल्पाचे काम 14 महिन्यांपूर्वी पूर्ण होणे अपेक्षित असताना पंत्राटदारांकडून उशीर करण्यात आला आहे. हा प्रकल्प आता वाढीव मुदतवाढीत पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीएतर्फे योग्य ती कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे. याबाबत गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे तसेच एमएमआरडीए आयुक्तांना पत्र पाठवले आहे.