
लग्न जुळणाऱ्या संकेतस्थळावरून ओळख झालेल्या ठगाने तो आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून एका तरुणीची फसवणूक केल्या प्रकरणी साकीनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तक्रारदार या अंधेरी येथे राहत असून त्या ग्राफिक डिझायनरचे काम करतात. एका लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळामुळे या तरुणीची आरोपीशी ओळख झाली. आरोपीने आपण सातारा येथे राहत असून आपले वडील लष्करातून निवृत्त झाले असल्याचे भासवले. तसेच आपण विमानतळावर काम करत असून आपली तिकडे चांगली ओळख असल्याच्या भूलथापा मारल्या. ओळख असल्याने तरुणीलादेखील विमानतळावर काम देतो असे सांगून एक लाख 8 हजार रुपये घेतले.
पैसे घेतल्यानंतर ठगाने आपला अपघात झाल्याचे सांगून काही पैसे तरुणीला परतदेखील केले होते. गेल्या वर्षी ठगाने तरुणीला एका खासगी विमान पंपनीचे नियुक्ती पत्र आणून दिले होते. जानेवारी महिन्यापासून नोकरीस रुजू होण्यास सांगितले. तरुणीने यासह माहिती तिच्या मैत्रिणीच्या भावाला सांगितली. त्याने तेथे नोकरीबाबत शहानिशा केली असता ते नोकरीचे प्रमाणपत्र खोटे निघाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने ठगाची माहिती काढण्यास सुरुवात केली. ठगाने आपले घाटकोपर आणि सातारा येथे घर असल्याचे सांगितले होते, मात्र त्या दोन्ही ठिकाणी ठगाचे घरच नसल्याचे उघड झाले आहे. तसेच त्याने तरुणीला आयपीएसचे ओळखपत्र तरुणीला पाठवले होते, तेदेखील बनावट असल्याचे समोर आले आहे. ठगाने तरुणीच्या आणखी एका मैत्रिणीची देखील अशाच प्रकारे फसवणूक केली होती. फसवणूकप्रकरणी महिलेने साकीनाका पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे
























































