साहेब सगळं खरं सांगतो; पण आम्हाला वाचवा, टीईटी घोटाळ्यांतील अपात्र शिक्षकांची विनवणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘साहेब सगळं खरं सांगतो, पण आम्हाला प्रकरणातून वाचवा’, अशी ही विनवणी आहे, अपात्र शिक्षकांची! सायबर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर होणाऱ्या या शिक्षकांची पोलिसांच्या प्रश्नापुढे अक्षरश: भंबेरी उडत आहे, तर कागदपत्रे दाखवूनही प्रकरणातील तो मी नव्हेच, अशीही भूमिका काहीजणांनी घेतली आहे. दरम्यान, याप्रकरणी बहुतांश जणांनी पोलीस तपासात सहकार्य केल्यामुळे त्यांना साक्षीदार करण्यात येणार आहे.

पुणे सायबर पोलिसांनी दोन्ही टीईटी घोटाळ्यांतील अपात्रांची नावे शॉर्टलिस्ट केल्यानंतर त्यांना टप्प्याटप्प्याने चौकशीला बोलाविले जात आहे. टीईटी 2018 आणि 2019-20 परीक्षेतील घोटाळा प्रकरणात शिक्षण परिषदेच्या आयुक्तांपासून परीक्षा नियोजनाचे कंत्राट असलेल्या जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीसह एजंटांच्या साखळीने कोट्यवधींची माया गोळा केली आहे.

दरम्यान, दोन्ही परीक्षेत मिळून 9 हजार 400 अपात्र उमेदवारांना जादा मार्क देऊन पात्र केले. संबंधितांना चौकशीसाठी बोलावून माहिती घेतली जात आहे. परीक्षेत पात्र होण्यासाठी कोणाकोणाला पैसे दिले, रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, पैशांची देवाण-घेवाण कशी झाली, अशा स्वरूपातील प्रश्नांपुढे अपात्र उमेदवारांची भंबेरी उडत आहे.

अपात्र उमेदवारांनी पोलीस तपासात सहकार्य न केल्यास त्यांच्याविरुद्ध थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला होता. संबंधितांना बोलावून घेत त्यांचा थेट गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का, या दृष्टीनेही तपास सुरू आहे. कारवाईच्या भीतीने राज्यभरातील विविध शिक्षण संस्थांत कार्यरत असलेले अपात्र चौकशीसाठी पुणे सायबर पोलीस ठाण्यात हजेरी लावत आहेत.

थेट शिक्षण परिषदेच्या आयुक्तांनाच दिले पैसे

टीईटी परीक्षेत पात्र करण्यासाठी शिक्षण परिषदेचा तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे याने थेट अपात्र उमेदवारांकडून पैसे घेतल्याचे उघडकीस आले आहे. प्रत्येकी उमेदवारांकडून 50 हजारांपासून एक लाखापर्यंतची रोकड सुपेने स्वीकारली आहे. नोकरीसाठी काही उमेदवारांनी पत्नीचे दागिने विकले, तर काहींनी जमीन विकून रक्कम दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या प्रकरणातून आम्हाला मार्ग सुचवा, अशी विनवणी पोलिसांना अपात्रांकडून करण्यात येत आहे.