गणपती पंचायतनच्या तत्कालीन व्यवस्थापकासह दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांगलीतील श्री गणपती पंचायतन संस्थानचे तत्कालीन व्यवस्थापक बाळकृष्ण नथमल जाजू (सध्या रा. मुंबई) आणि महावीरप्रसाद सीताराम मालाणी (सांगली) या दोघांनी बेळगाव येथील संस्थानची 26 गुंठे जमीन विकून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जाजू याला बेळगाव पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. संस्थानच्या कायदेशीर सल्लागार ऍड. अर्पिता दिवाण यांनी ही माहिती दिली.

संस्थानचे राजे श्रीमंत विजयसिंहराजे माधवराव पटवर्धन यांनी संस्थानचा कारभार सांभाळण्यासाठी 2002मध्ये जाजू याची व्यवस्थापक म्हणून नियुक्ती केली होती. मात्र, त्याने 2002 ते 2015 या कालावधीत संस्थानची व काही लोकांची फसवणूक करून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला. त्यामुळे राजे पटवर्धन यांनी त्याला पदावरून काढून टाकले. त्याचे सर्व अधिकार रजिस्टर कागदपत्रांद्वारे संपुष्टात आणले होते. राजेसाहेबांनी कायदेशीर कारवाई न करता त्याला मोठ्या मनाने माफ केले होते. मात्र, जाजूने याचा फायदा घेत बेळगाव येथील संस्थानच्या नावे असलेल्या 26 गुंठे जमिनीचा व्यवहार केला. त्यासाठी महावीरप्रसाद मालाणी याच्याशी संगनमत केले. मी एकमेव व्यवस्थापक असल्याचे खोटे सांगून न्यायालयाची फसवणूक करून संस्थानच्या जागा 16 लाखांना विकल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.