
जैववैविध्याने समृद्ध असलेल्या कोल्हापूरच्या राधानगरी अभयारण्यात पट्टेरी वाघाचे दर्शन झाले आहे. वन्यजीव विभागाच्या कॅमेऱ्यात या पट्टेरी वाघाचे छायाचित्र टिपले गेले आहे. यापूर्वी 2019 मध्ये एकदा वाघाचे छायाचित्रण झाले होते.त्यानंतर वाघाचे छायाचित्रण झाले नव्हते. वनाचे संरक्षण, कुरण विकास, प्रशिक्षित आणि सतर्क वन कर्मचारी, वणव्याचे घटलेले प्रमाण या सर्व बाबींमुळे राधानगरीचा अधिवास वाघासाठी पूरक झाल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे.
जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून पालकमंत्री सतेज पाटील यांनी वन्यजीव निरीक्षणास ट्रॅप कॅमेरा खरेदी करण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून शंभर ट्रॅप कॅमेरा खरेदी करण्यात आले होते. हा ट्रॅप कॅमेरा राधानगरी दाजीपूर जंगलामध्ये लावण्यात आला असून, पंचवीस दिवस वन्य जीवन निरीक्षणाची कार्यवाही प्रगतिपथावर आहे.
11 एप्रिल 2022 रोजी सर्व वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन जंगलात मोक्याच्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले.काल शनिवार 23 एप्रिल 2022 रोजी लावलेल्या ट्रॅप कॅमेरामध्ये पूर्ण वाढ झालेला पट्टेरी वाघ छायाचित्रीत झाला आहे.
वाघाच्या अंगावरील पट्टे हे विशिष्ट असतात. त्यामुळे वाघा-वाघांमधील फरक शास्त्रीय पद्धतीने ओळखता येतो.राधानगरी येथील वाघाचे पट्टे कर्नाटक व गोवा या राज्यातील वाघांच्या पट्ट्यांशी जुळतात काय हे संगणकावरील रेकॉर्डवर पाहण्यात येणार आहे. जर ते पट्टे जुळले तर हा वाघ स्थलांतरित होऊन आल्याचा निष्कर्ष काढला जाईल. जर ते पट्टे जुळले नाहीत तर या वाघाची उत्पत्ती राधानगरी अभयारण्यातच झाली, असा निष्कर्ष काढण्यात येईल. प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी विभागीय वन अधिकारी विशाल माळी यांना अधिक सतर्क राहून जास्त निरीक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
























































