
उत्तरेकडून वाहणाऱया कोरडय़ा आणि गरम वाऱयामुळे मुंबईचा पारा 37 अंश सेल्सियसवर पोहोचला आहे. त्यामुळे मुंबईकरांचा अक्षरशः घामटा निघाला आहे. वाढत्या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असून पुढील काही दिवस मुंबईकचे तापमान 37 अंशांच्याच पुढे राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
आकाश निरभ्र असल्याने उन्हाचा थेट संपर्क येत असल्यामुळे मुंबईकरांना जीव नकोसा झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडल्यानंतर योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन कुलाबा वेधशाळेच्या शास्त्र्ाज्ञ सुषमा नायर यांनी केले आहे.
राज्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. पुण्यात आज ढमढेरे येथील पारा 44 सेल्सिअस तर जळगावमध्येही पारा 43 सेल्सिअस राहिला.
z उत्तरेकडून येणारे कोरडे आणि गरम वारे, निरभ्र आकाश, हवेतील कमी झालेले बाष्प आणि अरबी समुद्राकडून म्हणजे पश्चिमेकडून येणारा वारा येत नसल्यामुळे मुंबईचा पारा हा पुढील काही दिवस 36 ते 38 सेल्सिअसमध्येच राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचे डोके गरमच राहणार आहे.
वीजही तापली, आतापर्यंतची सर्वाधिक 3772 मेगावॅटची विक्रमी मागणी
वाढलेल्या तापमानामुळे एसी, पंखे, कुलर चोवीस तास ऑन डय़ुटी आहेत. त्यामुळे आज मुंबईची विजेची मागणी आतापर्यंतची सर्वाधिक 3772 मेगावॅट या विक्रमी टप्प्यावर पोहचली आहे. 22 एप्रिल रोजी 3666 मेगावॅट विजेची मागणी नोंदली होती.
n बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास खार पश्चिम परिसराला वीजपुरवठा करणाऱया अदानी इलेक्ट्रिसिटीच्या दोन्ही केबल लाइनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे खार आणि वांद्रे परिसरातील सात हजारहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा तब्बल सात ते आठ तास बंद होता.
n बेस्टकडून केल्या जाणाऱया 11 किलो व्होल्टच्या विद्युत पुरवठय़ात सकाळी सातच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे मुंबादेवी परिसरात वीज प्रवाह खंडित झाला होता. अर्ध्या तासानंतर तो सुरळीत झाला. तर सायंकाळी सहाच्या सुमारास प्रभादेवीतील 11 किलोव्होल्टच्या फिडरमध्येही तांत्रिक बिघाड झाला.




























































