
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठवडय़ापासून उन्हाचा पारा वाढत आहे. 36 ते 37 वर असलेला पारा दोन दिवसांपासून 40 अंशावर जाऊन ठेपल्यामुळे अक्षरशः उन्हाच्या झळांच्या लाटा निघू लागल्या आहेत. त्यातच भारनियमनाच्या फटक्याने अंगाच्या लाहीलाहीने नागरिक हैराण झाले असतानाच सायंकाळी अचानक आलेल्या वादळी अवकाळी पावसाने कोल्हापूरला झोडपून काढले. या पावसाने हवेत गारवा निर्माण होण्यास मदत झाली. मात्र, अनेक ठिकाणी झाडे पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला, तर अनेक ठिकाणी वाहतुकीचाही खोळंबा झाला होता.
कोल्हापूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून तापमानात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. एरव्ही 36 अंशांवर असणारा पारा दोन दिवसांपासून 40 अंशावर पोहोचला आहे. पुढील दोन दिवस तापमानाची स्थिती अशीच राहील, असा अंदाज व्यक्त करत हवामान खात्याने ‘यलो अलर्ट’ दिला होता. सकाळपासूनच हवेत उकाडा जाणवत होता. दहा-अकरानंतर उन्हाचे चटके जाणवत आहेत. दुपारी एक-दोनच्या सुमारास तर उन्हाच्या झळा निघत असून, अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. त्यामुळे रस्त्यावर वर्दळ कमी झाल्याचे चित्र आहे.
दरम्यान, दिवसभराच्या उकाडय़ानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने शहर आणि परिसराला झोडपले. वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी धुळीचे प्रचंड लोट निर्माण झाले. काही ठिकाणी लहान-मोठी झाडे उन्मळून पडली. त्यामुळे बहुतांश ठिकाणी वीजपुरवठा आणि वाहतुकीचा खोळंबा झाला होता. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. सुमारे तासभर पडलेल्या धुव्वांधार पावसाने वातावरणात काही काळ थंडावा निर्माण झाला होता.























































