नाद- मराठी : घन घन माला…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अरुण जोशी

मन्ना डे यांचं घराघरांत पोहोचलेलं मराठी गाणं म्हणजे ‘घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा.’ ‘वरदक्षिणा’ चित्रपटातलं हे केवळ ऐकून कोणाला ते पावसाळ्यातील प्रणयप्रसंगावर वगैरे असेल असं वाटलं तर त्याची फसगत होईल. नायक रमेश देव चहा पिऊन कप विसळू पाहातोय तर नळाला पाणी नाही… आणि तळमजल्यावर ‘घन घन माला’ची तालीम चाललीय. नायक खाली येतो, गाणं पुढच्या कडव्याकडे जातं आणि ‘अंगणी अवघ्या तळे साचले’, म्हणेपर्यंत नळ सुरू होऊन मोरी तुडुंब भरते! वसंत पवारांचं अप्रतिम संगीत या गाण्याला लाभलंय. चित्रपटात गाण्यातली दोनच कडवी येतात, पण वर्षाकालीन सायंकाळी, लुकलुक करिती दिवे गोकुळी! उगाच त्यांच्या पाठीस लागे भिरभिरता वारा’ हे मधलं कडवं, मन्ना डे यांच्या रेकॉर्ड झालेल्या गाण्यात असावं. कारण माझ्या संग्रही ते आहे. त्या कडव्यातली सरगमही श्रवणीय. सध्याच्या उन्हाळ्यात ते गाणं मनाला गारवा देईल.

मराठीत बरीच गाणी गाणारे मन्नादा मूळचे बंगालचे. कोलकात्यात 1 मे 1919 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या घरात गाणं होतं म्हणजे त्यांचे काका आणि पहिले गानगुरू कृष्णचंद्र (के.सी.) डे प्रसिद्ध संगीतकार होते. जन्मनाम प्रबोधचंद्र असलेल्या ‘मन्ना’ला ते गाणं शिकवत. पुढे त्यांच्याबरोबरच तो मुंबईला आला. उस्ताद अमनअलींकडून शास्त्र्ााrय संगीताची रीतसर तालीम घेतल्याने मूळच्या गोड आवाजाला अधिक उठाव आला. 1942 मध्ये मन्ना डे मुंबईत आल्यावर त्यांनी पहिलं हिंदी गाणं गायिलं ते आपले मराठी संगीतकार पंडित शंकरराव व्यास यांच्या संगीत दिग्दर्शनात. ‘रामराज्य’ चित्रपटासाठी त्यांनी खरं तर के. सी. डे यांनाच विचारलं होतं. त्या वेळी हा होतकरू तरुण त्यांना भेटला आणि ‘गयी तू गयी त्यागमयी’ हे गाणं मन्ना डे यांच्या स्वरात ध्वनिमुद्रित झालं.

मन्ना डे यांनी एकूण 185 चित्रपटांत 3500 पेक्षा जास्त गाणी गायिली. मन्ना डे यांनी गायिलेल्या मराठी गाण्यांमध्येही खूपच विविधता आहे. अण्णा जोशी यांनी संगीत दिलेल्या ‘संत नामदेव’ आणि ‘संत तुकाराम’ या चित्रपटांमधले अभंग त्यांनी ज्या प्रासादिकतेने गायिले त्याचप्रमाणे ‘देवकीनंदन गोपाला’ या गाडगेबाबांच्या जीवनावर आधारित चित्रपटातलं त्यांचं ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला, सांभाळ ही तुझी लेकरे, पुण्य समजती पापाला’ हे गीत भक्तिरसाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचाही संदेश देतं. ते जरूर ऐका.

संगीतकार राम कदम यांच्या संगीताने सजलेल्या ‘एक धागा सुखाचा’ या चित्रपटासाठी मन्ना डे यांनी ‘अ आ आई, म म मका’ हे चिमुकल्यांसाठीचं गाणं उत्कटतेने गायिलं. मन्ना डे यांची मराठी युगुल प्रेमगीतंही तितकीच गायली. कुणाला फारसं ठाऊक असेल नसेल, पण संगीतकार एम. शफी यांनी स्वरबद्ध केलेलं, लता मंगेशकर आणि मन्ना डे यांचं ‘प्रीत रंगली ग।़।़, कशी राजहंसी’ हे गाणं ऐकताना लतादीदींनी ‘अगं बाई ग लाजली हंसी, बोले ना।़ ती तुझ्याशी’ म्हणताना जी मुरकी घेतलीय ती लाजवाब. या गीताचे कवी होते श्रीकृष्ण पोवळे.

शांता शेळके यांनी लिहिलेलं, वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेलं ‘दोन घडींचा डाव’ चित्रपटातलं ‘सारखा काळ चालला पुढे’ किंवा ‘दाम करी काम’ सिनेमातलं ‘धुंद आज डोळे, हवा धुंद झाली’ हे जगदीश खेबुडकर यांचं, प्रभाकर जोग यांनी संगीत दिलेलं सुरेल गाणं अथवा ‘हाऊस ऑफ बॅम्बू’सारखं ‘घरकुल’ चित्रपटातलं सी. रामचंद्र यांनी संगीत दिलेलं गीत असो, मन्नादांच्या स्वरांनी प्रत्येक गीताला न्याय दिला. त्याचा आवाज रफीसारखा पहाडी किंवा तलतसारखा मुलायम नव्हता, पण त्या दोन्हीमधली जागा भरून काढणारा नक्कीच होता. चित्रपटगीतांमधलं त्यांचं ‘धन्य ते संताजी धनाजी’मधलं ‘जय जय हो महाराष्ट्राचा’ हे गीत मिळालं तर जरूर ऐका. मन्नादांनी मराठीत केवळ चित्रपटगीतंच गायिली असं नाही तर ‘बुद्ध हवा की युद्ध हवे’ या वसंत नलावडे यांच्या शब्दातलं श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेलं स्फूर्तिगीतही आठवतं. अशा या अष्टपैलू गायकाला 94 वर्षांचं उदंड आयुष्य लाभलं. नव्वदीतही ते खासगी कार्यक्रमात गात असतं. 1971 मध्ये त्यांच्या गानसेवेचा गौरव करणारी ‘पद्मश्री’ तर 2005 मध्ये ‘पद्मभूषण’ सन्मान प्राप्त झाला आणि ‘दादासाहेब फाळके’ हा मानाचा पुरस्कारही मन्ना डे यांना 2007 मध्ये लाभला. त्यांच्या सांगीतिक कारकीर्दीतला तो सुवर्णक्षण होता.