
एसटीच्या उत्पन्नात पडणार भर
कोरोना नियंत्रणात आल्यानंतर आता कुठे सर्वसामान्य माणूस मोकळा श्वास घेऊ लागला आहे. उन्हाळ्यात बच्चे कंपनीपासून सर्वांनाच मे महिन्याच्या सुट्टीत वेध लागले आहेत ते मामाच्या गावाला जायचे. आता ‘लाल परी’तून आपल्या गावाला जाता येणार आहे. त्यासाठी एसटीच्या ठाणे विभागातून 43 जादा उन्हाळी बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे या जादा बसेस 15 जूनपर्यंत सोडल्या जाणार आहेत. त्यामुळे उन्हाळ्याची सुट्टी कमी खर्चात गोरगरीब व मध्यमवर्गीयांना एन्जॉय करता येणार आहे.
कोरोना संकटाच्या काळात एसटीचे प्रचंड नुकसान झाले. त्यानंतर संपामध्ये बराच वेळ गेला. न्यायालयाच्या निकालानंतर बहुतांश कर्मचारी कामावर हजर झाले असून जास्तीत जास्त बसेस रस्त्यावर धावू लागले आहेत. आता उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाल्याने उत्पन्न वाढवण्यासाठी एसटीच्या ठाणे विभागातून जादा बसेस कोकणासह राज्याच्या विविध भागात सोडल्या जाणार आहेत. ठाणे 1, ठाणे 2, विठ्ठलवाडी, मुरबाड, शहापूर, कल्याण, वाडा, भिवंडी अशा आठ डेपोंमधून नियमित गाड्यांच्या व्यतिरिक्त 43 जादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
एसटीच्या या निर्णयामुळे लहान मुलांना मामाच्या गावाला तर जाता येईलच, पण पर्यटनाचादेखील आनंद लुटता येणार आहे. त्यादृष्टीने ठाणे विभागाने वेळापत्रक तयार केले असून 15 जूनपर्यंत जादा गाड्या सोडण्यात येतील. त्याचा प्रवाशांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा, असे आवाहन विभागीय नियंत्रक विनोद भालेराव यांनी केले आहे.
अशा गाड्या सुटणार
ठाणे1आगार : ठाणे-शिरुर, बोरीवली-मंचर,ठाणे-सांगोला, ठाणे-पाटण, ठाणे-कराड -गलमेवाडी, ठाणे-बागमांडला, ठाणेवडुज व्हाया फलटण, बोरीवली-पाचोरा, ठाणे-साकोरी व्हाया चाकण, ठाणे-जामनेर, ठाणे-चोपडा. ठाणे 2 आगार : ठाणेकराड, ठाणे-नारायणगाव, ठाणे-दापोली, ठाणे-नंदुरबार, भिवंडीजुन्नर, भिवंडी-गोंदवले, भिवंडी-कराड-कडेगाव, भिवंडी- नेवासा. शहापूर आगार : शहापूर – अक्कलकुवा, शहापूर – रावेर, शहापूर – चोपडा, शहापूर – चाळीसगाव. कल्याण आगार : कल्याण- भोरगिरी, कल्याण-पाचगणी शिवशाही, कल्याण-धुळे, कल्याण-जामखेड. मुरबाड आगार :कल्याण-अवसरी, कल्याणसाकोरी, कल्याण- अहमदनगर, कल्याण-पाथर्डी. विठठलवाडी आगार : बदलापूर – दापोली, बदलापूर – गुहागर, विठ्ठलवाडी -विटा, विठ्ठलवाडी-कोल्हापूर शिवशाही, बदलापूर- नंदुरबार, बदलापूर-जळगाव, बदलापुर-अंमळनेर. वाडा आगार : कल्याणनाशिक व्हाया जव्हार, कल्याण-नाशिक व्हाया जव्हार, कल्याणनाशिक व्हाया जव्हार, कल्याण-नाशिक व्हाया जव्हार.
























































