
>> प्रसाद कदम
एकदा जागा भाडय़ाने घेतल्यानंतर पाच-सहा महिने फर्निचरसाठी फुकट घालवणे कोणालाही आर्थिकदृष्टय़ा परवडणारे नाही. अशा वेळी मॉडय़ुलर फर्निचरची संकल्पना पुढे आली. आता घर घेतल्यानंतरही घराचा ताबा घेईपर्यंत मॉडय़ुलर फर्निचर तयार असते.
इंटिरियर डिझाइनचे शोरूम
आपण वाहनांचे, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे शोरूम पाहतो. प्रसाद कदम यांनी इंटिरियर डिझाईनचे शोरूम बनवले आहे. असे शोरूम तुम्हाला कोकणात पाहायला मिळणार नाही. शोरूममध्ये गेल्यावर तुम्हाला किचन ट्रॉली, बेड, टिपॉय, कपाट पाहायला मिळतात. अनेक वेळा आपण वस्तू घेताना फर्निचर कसे आहे, त्यात काय वापरले आहे ते पाहत नाही. फक्त पैसे किती वाचतात याकडेच आपले लक्ष असते, पण शोरूममध्ये गेल्यानंतर प्रत्यक्ष फर्निचर आपल्याला पाहता येते आणि कोणते फर्निचर तुम्हाला पाहिजे याची निवड करता येते.
पूर्वी घरात फर्निचरचं काम करायचं म्हटलं तर दोनचार महिने कारागीरांची ठकठक आणि खटखट सुरू असायची. आजकाल लोकांना घरात जागेवर फर्निचर बनवणं शक्य होत नाही. अशा वेळी मॉडय़ुलर फर्निचरलाच पसंती दिली जाते. आता कोकणातही मॉडय़ुलर फर्निचरचा ट्रेंड आला आहे. कारागीर घरी येऊन माप घेऊन जातो आणि फर्निचर तयार करून घरी आणून बसवून देतो. हे फार झटपट होतं.
बँक, हॉटेल, ऑफिसमध्ये मॉडय़ुलर फर्निचरचा वापर खूप पूर्वीपासून सुरू झाला. कारण एकदा जागा भाडय़ाने घेतल्यानंतर पाच-सहा महिने फर्निचरसाठी फुकट घालवणे कोणालाही आर्थिकदृष्टय़ा परवडणारे नाही. अशा वेळी मॉडय़ुलर फर्निचरची संकल्पना पुढे आली. आता घर घेतल्यानंतरही घराचा ताबा घेईपर्यंत मॉडय़ुलर फर्निचर तयार असते. कमीत कमी जागेत जास्तीत जास्त फर्निचर हे मॉडय़ुलर फर्निचरचे एक वैशिष्टय़ आहे. तसेच पूर्वी भाडय़ाच्या घरामध्ये आपण फार फर्निचर करत नव्हतो. कारण दुसऱया ठिकाणी गेल्यानंतर ते फुकट जाईल असे आपले मत असायचे, परंतु मॉडय़ुलर फर्निचर कोणत्याही घरामध्ये जाऊन तुम्ही ते बसवू शकता. ही गरज ओळखून आता भाडय़ाच्या घरातही लोक मॉडय़ुलर फर्निचर घेताना दिसतात. सोफा कम बेड, लिफ्टअप बेड, विशिष्ट प्रकारच्या किचन ट्रॉली, कपाटांना ग्राहकांची विशेष पसंती आहे. धबधबा आणि पावसाच्या पाण्याचा अनुभव देणारे शॉवरही आता उपलब्ध होतात.
घराचं रंगकाम हाही एक महत्त्वाचा विषय आहे. थोडे जास्त पैसे खर्च केले तर पंधरा-पंधरा वर्षे टिकेल असे चांगल्या दर्जाचे रंगकाम करता येते. पूर्वी टय़ुबलाईट, सीएलएफ दिवे पाहायला मिळायचे. आता ती जागा एलईडी पॅनेलने घेतली आहे. पीव्हीसी किंवा पीओपीचे इंटिरियर डिझाइनही आपल्याला पाहायला मिळते. मुंबईत राहणाऱया अनेकांना कोकणात घर घेताना त्या घराला ‘कोकणपण’ यावे अशी अपेक्षा असते. अशा घरात लाकडाचा भरपूर वापर करावा लागतो. कालांतराने लाकूड खराब होते आणि खर्चही वाढतो. म्हणून वरून लाकडाचे स्वरूप असलेल्या ऍल्युमिनियमचा वापर केला जातो. त्याचा उपयोग खिडक्या आणि दारांसाठी करता येतो. त्यामुळे घराला कोकणातल्या घराचा लूक मिळतो. इंटिरियर डिझाइनमध्ये अनेक नवीन बदल घडत आहेत. आणि तो बदल ग्राहकवर्ग स्वीकारत आहे. प्रसाद कदम आपल्या 22 वर्षांच्या अनुभवातून सांगतात की, कोरोनानंतर ग्राहकांच्या मागणीमध्ये खूप बदल झालाय. लॉक डाऊनच्या काळात सर्वजण घरी होते. घरात राहिल्यामुळे दिवसभर घरात आपल्याला कोणत्या वस्तूची गरज आहे याची जाणीव प्रत्येकाला होऊ लागली. मग एसी, किचन ट्रॉली, डिश वॉशर, टिपॉय, टेबल अशा अनेक गोष्टींची गरज भेडसावू लागली. मग त्या वस्तू खरेदी करण्याकडे कल निर्माण झाला. परदेशात मॉडय़ुलर फर्निचरची संकल्पना खूप जुनी आहे, पण आपल्याकडे आता मॉडय़ुलर फर्निचरची मागणी वाढली आहे.
(लेखक रत्नागिरीतील इंटिरियर डिझायनर आहेत)
शब्दांकन – दुर्गेश आखाडे

























































