शाळा सुरू होण्याआधी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके पोहोचवण्याचे नियोजन केले असून या वर्षीदेखील सर्व विद्यार्थ्यांना वेळेत पाठ्यपुस्तके मिळणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. समग्र शिक्षा अभियानातंर्गत पाठ्यपुस्तकाच्या वितरणाचा प्रारंभ आज त्यांच्या हस्ते बालभारतीच्या गोरेगाव भांडारात करण्यात आला.
समग्र शिक्षा अभियान अंतर्गत राज्यातील जिल्हा परिषदा, नगरपालिका, महापालिका, कटक मंडळे तसेच अनुदानित शाळांना राज्य सरकारच्यावतीने इयत्ता 1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते. येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे जून 2022 पासून राज्यातील शाळा नियमितपणे सुरू होत आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मिळण्याच्या दृष्टीने योग्य ते नियोजन करण्यात आले असून ही पाठ्यपुस्तके शाळेत वेळेत पोहोचण्याकरिता मोफत पाठ्यपुस्तक वितरणाला सुरुवात करण्यात आली. दरम्यान, शालेय वर्ष 2022-23 करता एकूण 5 कोटी 40 लाख प्रतींचा पुरवठा करण्यात येणार आहे. यावेळी शिक्षण विभागातील संचालक कैलास पगारे, बालभारतीचे नियंत्रक विवेक गोसावी, मुंबई शिक्षण उपसंचालक संदीप संगवे, मुंबई महापालिकेचे शिक्षण अधिकारी इंदरसिंह गडाकोटी, शिक्षण निरीक्षक देविदास महाजन, वणवे आदी उपस्थित होते.
पुण्यातूनही अभियानाला सुरुवात
पुणे येथील बालभारती भांडारात समग्र शिक्षा अभियान वितरणाला राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. यावेळी माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर, प्राथमिक संचालक दिनकर टेमकर, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, वित्त व लेखा अधिकारी भारती देशमुख, अंतर्गत लेखापरीक्षण अधिकारी उज्ज्वला ढेकणे आदी उपस्थित होते.






























































