
>> संजीव प्र. कुसुरकर
श्री गीतेच्या सोळाव्या अध्यायातील पहिल्या तीन श्लोकांत दैवी संपत्तीचे वर्णन आले आहे. त्यावर श्री माऊलींनी केलेले 148 ओवींचे सुरेख भाष्य अशा दैवी संपत्तीने युक्तांचे एक मनोहारी दर्शन उभे करते. आजच्या काळात अशा व्यक्ती खरोखर असतात का, हा अनेकांना प्रश्न पडणे स्वाभाविक असले तरी अशा व्यक्ती आहेत हे ज्यांनी आपल्या जीवनव्रत साधनेने सिद्ध केले आहे, त्यामध्ये ज्ञान प्रबोधिनी सोलापूर हराळी संस्थेच्या प्रमुख डॉ. स्वर्णलता भिशीकर ऊर्फ लताताई यांचे नाव अग्रक्रमाने समोर येते. त्यांनी नुकतीच वयाची एकाहत्तरी पूर्ण केली.
लताताई मूळच्या पुणे येथील, ज्येष्ठ संपादक कै. बापूसाहेब भिशीकर यांच्या सुकन्या. ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक कर्मयोगी कै. अप्पासाहेब पेंडसे यांच्या मार्गदर्शनात तरुणपणी विचारांची एक प्रगल्भ जोड त्यांना लाभली. वडील कै. बापूसाहेबांचा पाहिलेला संघप्रणित प्रखर राष्ट्रवाद,आई कुसुमताई यांचे राष्ट्र सेविका समितीचे कार्य, तसेच वात्सल्यभाव, घरात लाभलेले आध्यात्मिक संस्कार, उच्च शिक्षण आणि धडाडी बाणा याचे संमिलीत स्वरूप म्हणून ज्ञान प्रबोधिनी युवा कार्यकर्त्या ते समर्थ नेतृत्व असा त्यांचा झालेला प्रवास अनेक अडचणी आव्हानांचा सामना करीत आज एका सर्वमान्य मार्गदर्शक, प्रेरणा स्थान या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे.
स्वामी माधवनाथ यांच्याकडून प्राप्त अनुग्रह त्यांना कर्म, ज्ञान,भक्ती आणि ध्यान योगाच्या साधक अवस्थेपासून सिद्धावस्था अनुभव प्रांतापर्यंत घेऊन गेला आहे. तरीही त्या
देखे प्राप्तार्थ जाहले।
जे निष्कामता पावले।
तयाही कर्तव्य असे उरले लोकांलागी
(श्री ज्ञानेश्वरी 3.155)
यास अनुसरून त्यांनी निवडलेले शिक्षण क्षेत्र आणि भावी पिढी नितीयुक्त विचारांनी सुसंपन्न बनेल यासाठी करीत असलेले अविरत प्रयत्न त्यांच्या कार्याची थोरवी प्रतित करतात.
कै. अवंतिकाबाई आणि जनुभाऊ केळकर दांपत्याने लावलेले बाल विकास मंदिर, सोलापूरचे रोपटे त्यांनी ज्ञान प्रबोधिनीचे डॉ. अण्णासाहेब ताम्हनकर आणि लताताई भिशीकर यांच्या हाती विश्वासाने सोपवले. या संधीचे सोने करीत कै. अण्णा आणि लताताईंच्या उचित नियोजन कार्यशैली आणि अपार निष्ठेने आज ज्ञान प्रबोधिनी सोलापूरचे वैभव ठरले आहे. भूकंपग्रस्त भागात हराळीला आज उभी असलेली ज्ञान प्रबोधिनीची वास्तू अण्णा आणि लताताई यांच्या जिद्धीचे,कष्टाचे, सफलतापूर्वक कर्तृत्वाचे दर्शन घडविते. ज्ञान प्रबोधिनीत सुरू असणारे सत्संग केंद्र यामागे लताताईंची प्रेरणा आहे. सर्व संप्रदाय,त्यांच्या पद्धती भिन्न असूनही कोणताही सांप्रदायिक अभिनिवेश न बाळगता त्यांना एकत्र आणून होत असलेली सामूहिक साधना लताताईंच्या व्यापक विचारांची साक्ष पटवते.
‘साधू दिसताती वेगळाले, परी अवघे स्वरुपी मिळाले’ हा संतबोध येथे प्रत्यक्षात अनुभवता येतो. लताताईंचे निरूपण शब्द जैसे कल्लोळ अमृताचे याप्रमाणे असते. वेद, उपनिषदे, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, एकनाथी भागवत,दासबोध या ग्रंथांचा त्यांचा असलेला सखोल अभ्यास निरूपणास एका अलौकिक उंचीवर नेऊन ठेवतो. संसार नेटका केला पाहिजे, पण त्यास परमार्थाची जोड लाभल्यास अनेक समस्या सहज सुटू शकतील हा लताताईंचा आग्रह आज साधकांच्या आचरण मूल्यांचा गाभा ठरला आहे हे त्यांचे खूप मोठे देणे आहे! बाल विकास मंदिर, सोलापूरची जुनी वास्तू आता तज्ञांच्या सल्ल्यानुसार पाडावी लागणार असल्याने तेथे नवीन भव्य वास्तू उभारली जाणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी या सत्कार्यास सढळ हातभार लावणे गरजेचे आहे. कारण सोलापूरच्या नावलौकिकात ही वास्तू मोलाची भर घालेल यात शंका नाही!
लताताई आज एकाहत्तरी पूर्ण करीत आहेत. त्यांच्या कार्याचा आवाका, उत्साह आणि परिश्रमाची तयारी केवळ अगम्य करणारी आहे.सोनयासि जोडले, सौरभ्य जैसे (13.588) असे त्यांचे स्वर्णलता हे नाव सार्थ आहे. आमच्यासाठी त्या लताताई आहेत कां सुवर्णशुद्धी कसु,सोळावा जैसा या त्यांना साधनेने,गुरुकृपेने प्राप्त अवस्थेचा लाभ आपणा सर्वांना दीर्घकाळ लाभावा यासाठी त्यांच्या आरोग्यसंपन्न शतायुषासाठी प्रार्थना!
























































