नगर शहरातील उद्याने ‘बीओटी’वर देण्याच्या हालचाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मनुष्यबळाअभावी देखभाल-दुरुस्ती होत नसल्याने नगर महापालिकेची उद्याने ‘बांधा वापर व हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वावर देण्याचा घाट घातला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने त्यांच्या हद्दीतील उद्याने अशी खासगीकरणातून चालवण्यास दिली आहेत, त्याच धर्तीवर नगरमधील उद्यानांचीही खासगीकरणातून देखभाल-दुरुस्ती करण्याची तयारी सुरू आहे.

सावेडीतील गंगा उद्यानाप्रमाणे शहरातील अन्य उद्यानेही बीओटी तत्त्वावर विकसित करण्यात येणार असल्याचे मनपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या गंगा उद्यान, सिद्धिबाग हे बीओटी तत्त्वावर देण्यात आले असून, आता इतर उद्यानांचाही तसाच प्रयोग मनपा करणार का, असाच सवाल विचारला जात आहे. नगर शहरातील छोटय़ा-मोठय़ा 52 उद्यानांच्या देखभालीसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने ती ‘बीओटी’ तत्त्वावर खासगीकरणातून चालवण्यास देण्याचा महापालिकेचा विचार केला आहे.

मनपावर बीओटी तत्त्वावर हे उद्याने देण्याची वेळ का आली, असा सवाल विचारला जात आहे. मात्र, सरकारच्या वृक्षलागवड मोहिमेची उद्दिष्टपूर्ती, कोठे झाडे तोडण्याची कामे, प्रभागांतून गवत छाटणीची कामे व अन्य किरकोळ कामांसाठीही माणसे मिळवणे अडचणीचे होत असल्याने बाहेरचे मजूर लावून कामे करून घ्यावी लागतात. त्यांना त्यांच्या मजुरीचे पैसे वेळेवर मिळणेही बऱ्याचदा अडचणीचे होते. अशा स्थितीत महापालिकेच्या बागा नियमित देखभालीअभावी सुकून जाण्याची परिस्थिती असते. तेथील झाडलोट व पालापाचोळा उचलणेही वेळच्या वेळी होत नसल्याने उद्यान विभागाने खासगीकरणातून या उद्यानांच्या देखभालीचा विचार सुरू केला.

बांधा, वापरा व हस्तांतरित करा (बीओटी) या खासगीकरणाच्या तत्त्वावर उद्याने नव्याने विकसित करण्याचा विचार यामागे आहे. उद्यान देखभालीची आवड असलेल्या व्यक्ती, संस्था वा उद्योजकांना खासगीकरणातून देताना उद्यानांमध्ये सुधारणा करणे व त्यांची नियमित दैनंदिन देखभाल करण्याचे सांगितले जाणार आहे. यासाठी विविध अटीही टाकल्या जाणार आहेत. महापालिकेच्या वतीने उद्यान विकासाच्या या कामात कोणताही मोबदला दिला जाणार नाही, पण उद्याने दिलेल्या वेळेत खुली ठेवणे, त्यांची नियमित स्वच्छता व दुरुस्ती, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृह सुविधा, उद्यानांतील खेळण्याची देखभाल, कारज्यांची दुरुस्ती व देखभाल अशा नियमांसह खासगीकरणातून दिल्या जाणाऱ्या उद्यानात कोणतेही वैयक्तिक वा व्यावसायिक तसेच वाढदिवस कार्यक्रम करण्यास मनाई असणार आहे. केवळ उद्यानांच्या नामफलकाजवळ जाहिराती घेण्याची मुभा ठेवण्याचा विचार आहे. तसेच, उद्यान खासगीकरणातून देताना सुरक्षा ठेवही घेतली जाणार आहे. शर्तीचे पालन न झाल्यास बीओटी तत्त्वावरील आदेश खंडित करण्यात येणार असल्याची माहितीदेखील मिळाली आहे.

मनपाला सतावतेय कर्मचारी संख्या

‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ या योजनेकडे जाण्याचा मनपाचादेखील प्रयत्न नसेल; परंतु सध्या स्थितीत मनपा कर्मचारी संख्या पाहता प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागत आहे. मनपाच्या उद्यान विभागामध्ये अनेक ठिकाणी वृक्षतोड वेळेवर होत नाही, अनेक ठिकाणी विजेच्या तारांवर वृक्ष आणि वेली असल्याने पावसाची शक्यता असल्याने हे काम करण्यासाठी कमी मनुष्यबळ असल्याने अशा समस्या उभ्या राहतात. यातून उद्यानाची देखभालदेखील होत नाही. या सर्व अडचणींवर मात करून काम पुढे नेण्यासाठी मनपाने हे नियोजन केले असल्याची शक्यता आहे.

धोरण ठरविण्याचे काम सुरू

पिंपरी-चिंचवड महापालिकेने राबविलेल्या अशा योजनेची माहिती संकलित केली गेली असून, त्याआधारे महापालिकेचे स्वतंत्र धोरण ठरवण्याचे काम सुरू आहे. येत्या काही दिवसांत ते प्रशासकीयदृष्टय़ा अंतिम झाले असल्याची माहिती समोर येत आहे. मनपाच्या उद्यान विभागाने अनेक जिल्हय़ातील उद्यानांचा अभ्यास करून हे नियोजन केले असून, बीओटी तत्त्वावर नियोजन करून ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ याचा विचार करण्यात आला आहे.

पिंपळगाव माळवी येथील जागेचे काय?

नगर शहराच्या जवळ मनपाची जवळपास 70 एकर जमीन आहे. या ठिकाणी बोटिंगची व्यवस्था करण्याची तयारी मध्यंतरी दर्शविण्यात आली होती; परंतु ती दोन महापौर झाले तरी नगरकरांची इच्छा पूर्ण झाली नाही. आता नवीन महापौरांनीही लवरकच बोटिंगचे काम सुरू करण्याची घोषणा केली आहे. यावर आता पिंपळगाव माळवी येथे योग्य पद्धतीने प्रशासनाने पुढाकार घेऊन आता यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे.