
अलार्म चेन पुलिंगचे वाढते प्रकार पाहता मध्य रेल्वेने रेल्वे स्थानकांवरील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीटांच्या दरात पंधरा दिवसांसाठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने लांबपल्ल्याच्या गाड्या सुटणार्या सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण, आणि पनवेल टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर 10 रूपयांवरून 50 रूपये करण्याचा निर्णय घेतला आहे.
गोदान एक्स्प्रेसची अर्लाम चेन खेचल्याने ही ट्रेन काळू नदीच्या पुलावरच टिटवाळा आणि खडवली दरम्यान बंद पडल्याने सहाय्यक लोको पायलट सतीश कुमार यांना आपला प्राण धोक्यात घालून ही ट्रेन चालू करावी लागली होती. त्यामुळे लांबपल्ल्यांसह उपनगरीय लोकलचे वेळापत्रकही बिघडत आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या उन्हाळी हंगामात उत्तरेकडे जाणार्या गाड्यांना होत असलेली गर्दी व चेन पुलिंगच्या घटनांमध्ये झालेली वाढ यामुळे अनावश्यक गर्दीला प्रतिबंध करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे उद्या 9 ते 23 मे पर्यंत सर्व लांबपल्ल्यांच्या गाड्या सुटणार्या टर्मिनसचे प्लॅटफॉर्म तिकीट दर 10 रूपयांवरून 50 रूपयांपर्यंत वाढलेले असतील, असे मध्य रेल्वेने म्हटले आहे. कोरोनाकाळात देखील सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी करण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीटांच्या दरात वाढ करण्यात आली होती. सध्या उन्हाळी हंगामात उत्तरेकडे जाणार्या गाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे. या गाड्यांच्या चेन खेचण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. विनाकारण चेन खेचल्याने सर्वांनाच फटका बसत आहे.
मध्य रेल्वेवर एकट्या एप्रिल महिन्यातच चेन पुलिंगच्या तब्बल 197 घटना घडल्या आहेत. सर्वात जास्त घटना उत्तरेकडे जाणार्या गाड्यांमध्ये घडल्या असून आरपीएफने 166 केसेस दाखल करीत 113 जणांना कोर्टात सादर करीत 56 हजाराचा दंडवसूल केला आहे. त्यामुळे प्रवाशांनी जास्त सामानासह प्रवास करू नये, स्थानकांवर गाडीच्या सुटण्याच्या अर्धातास आधी पोहचावे, विनाकारण सुरक्षा चेन खेचू नये असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.



























































