
खंडणी न देणाऱ्या लाँड्री दुकानदारावर कोयत्याने वार करणाऱ्या तिघांना सिंहगड पोलिसांनी अटक केली. ही घटना नुकतीच सिंहगड रस्ता भागातील नऱ्हे परिसरात घडली आहे. शिवराज शिंदे, मनोज चांदणे उर्फ मन्या, संजय चव्हाण, निखिल इंगळे अशी अटक करण्यात आलेल्या सराईतांची नावे आहेत.
अनिल दौलत भुवड (वय 43, रा. श्री गणेश एनक्लेव्ह) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनिल भुवड यांची श्री गुरुदत्तकृपा लाँड्री असून आरोपी शिंदे, चांदणे, चव्हाण, इंगळे हे कोयते घेऊन त्यांच्या दुकानात गेले. त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली. भुवड यांनी खंडणी देण्यास नकार दिला. त्यांच्यावर कोयत्याने वार करून जखमी केले. दरम्यान, दुचाकी पार्क करणाऱ्या तरूणावर कोयत्याने वार केल्याप्रकरणी संबंधित आरोपींविरूद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समीर दिलीप रानवडे (वय 29, रा. श्रीरंग अपार्टमेंट, नऱ्हे) याने फिर्याद दिली आहे. रानवडे श्रीरंग अपार्टमेंटसमोर दुचाकी लावत होते. त्यावेळी आरोपी शिवराज शिंदे आणि साथीदारांनी रानवडेला शिवीगाळ केली. त्याच्या डोक्यावर कोयत्याने वार करून जखमी केले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे तपास करत आहेत.



























































