संगमनेर शहरात तीन वाहने जाळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरासमोर उभ्या असलेल्या एका रिक्षासह दोन दुचाकी जाळून टाकल्याच्या घटना संगमनेर शहरातील घोडेकर मळ्याच्या परिसरासह जेधे कॉलनीत शुक्रवारी पहाटे घडल्या आहेत.

शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास या घटना घडल्या आहेत. याबाबत घोडेकरमळ्यात राहणाऱया जय तपेंद्रबहाद्दूर सुनार यांनी तक्रार दाखल केली आहे. आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास त्याच्या राहत्या घरासमोर उभी असलेली त्यांची दुचाकी अज्ञाताने पेटवून दिली. सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही बाब त्यांच्या लक्षात आली. ही दुचाकी पूर्ण जळून खाक झाली आहे.

दुसरी घटना घोडेकरमळ्यापासून जवळच असलेल्या पवार हॉस्पिटल परिसरात घडली आहे. येथे राहणाऱया कपिल दिलीप शिंदे यांची रिक्षाही पेटवून देण्यात आली आहे. तिसरी घटना जेधे कॉलनी येथे घडली असून, आकाश बाळू जेधे यांची घराच्या दारासमोर उभी असलेली दुचाकी पेटवून देण्यात आली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस नाईक विजय खाडे तपास करीत आहेत.