जंगलातील आई…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मातृप्रेमाची भावना जशी आपण माणसामध्ये पाहतो, तशी ती प्राणिमात्रामध्ये पण दिसते. आई आणि पिलं… अर्थात जोपर्यंत ते पिलू लहान आहे आणि आईवर अवलंबून आहे तोपर्यंत आपण प्राणी आणि पक्ष्यातलं आई-लेकराचं प्रेम पाहू शकतो, पण एकदा का ही पिलं मोठी होऊन स्वावलंबी झाली की मग मात्र ते आपले स्वतंत्र राहतात. लहान लेकराचे हात धरून रस्त्यावर चालत जाणारी स्त्र्ााr असो व जंगलात पिलांसह चालणारी कोठलीही प्राणी आई असो, हे दृश्य नेहमीच नजरबंदी करतं.

जंगलात फिरताना बऱयाच माय-लेकराचं नातं पाहण्याचा योग्य आला. काही अगदी मनात घर करून राहिली. माराच्या जंगलात एक बिबळ्याची मादी अगदी दोन एकदम लहान पिलांसह आहे ही खबर मिळाली. तिने तिची पिले कोरडय़ा नदीच्या पात्रात दरडीत व्यवस्थित दडवली होती. ती दिसण्याचा प्रश्न नव्हता. ती मात्र शिकारीला निघालेली दिसली. ती परत आली. मात्र तिचा आवाज बराच वेळ येत राहिला. नंतर ती शोधक नजरेने हिंडताना दिसली. बहुधा पिलं सापडत नसतील, असे गाईडने सांगितले. आम्ही फार अस्वस्थ झालो. पण काहीच इलाज नसल्यामुळे उगाच हूरहूर वाटू लागली. दिवसभर कशातच मन लागेना. सारखी ती समोर दिसू लागली. मग दुसऱया दिवशी बाकी कुठेच न जाता आम्ही भल्या पहाटे परत तिथेच गेलो. तर ती एका पिलाला घेऊन रस्ता ओलांडताना दूरवर दिसली. नंतर दुपारीही झाडीत त्या एका पिलाला दूध पाजत पहुडली होती. काय झालं माहीत नाही, पण तिचं एकच पिलू राहिलं होतं. ती जागा सेफ नसल्यामुळे तिने ताबडतोब जागा बदलली व आहे त्या पिलांची काळजी घ्यायला सुरुवात केली. मला तिचं हे प्रॅक्टिकल वागणं फार भावलं. तिने खूप शोध घेतला, पण नंतर परिस्थितीशी तडजोडही केली.

जेव्हा पिलं लहान असतात तेव्हा या सर्व माद्या त्यांचं खूप रक्षण करतात, सारख्या जागा बदलतात. सारख्या पिलाला ठेवलेय त्याच जागी जा-ये करत नाहीत. कोणी नाही पाहून हळूच पिले दडवून ठेवलेल्या जागी जातात. डिसेंबरमध्ये माराच्या जंगलात चित्ता मादी दिसली. अतिशय अस्वस्थपणे फिरताना दिसली. ती आमच्या अस्तित्वामुळे अस्वस्थ झाली होती. कारण आमच्या मागच्या झाडीत तिची तीन अगदीच छोटी पिले अगदी बारीक आवाज करीत होती. त्यांना दिसत नव्हते. कारण चित्त्याची पिले जन्मताच जवळ जवळ आंधळी असतात, पण आजूबाजूला त्यांना काहीतरी नकोशी चाहुल लागली होती. आम्ही तत्काळ तिथून दूर झालो. नंतर आमची पाठ फिरली की तिने पटापट पिले तोंडात धरून दुसरीकडे हलवली. प्राणी याबाबतीत खूप सावध असतात. हत्तीण आणि तिचे नुकतेच झालेलं पिलू ज्याच्या नाळेमधून अजूनही रक्त गळत होते, परंतु हत्तीण त्याला चालवत होती, ती स्वतः त्याच्या वेगाने म्हणजे अगदी हळू चालली होती, परंतु ती त्याला चालायचे धडे देत होती.

अजून एक सांगावीशी वाटणारी गोष्ट म्हणजे, टांझानियाच्या जंगलात मी दोन सिंहिणी त्याच्या एकूण आठ पिलांसोबत अगदी निवांत बसलेल्या पाहायला मिळाल्या. पिले अंगावर उडय़ा मारत होती. एकमेकांशी भांडत होती. कोणी दूध पिण्यासाठी आलं तर त्याच्या अंगावर उडय़ा मारत मारत हिंडत होती, तरी पण मी ह्या दोन आयांना अजिबात रागावलेल्या पहिल्या नाहीत. प्रचंड शांतपणे त्या पिलांना सांभाळत होत्या. नंतर उठून चालताना, एखादं पिलू मागे राहिलं की एकजण थांबत होती. मागे पुढे स्वतः चालून त्यांनी पिलांना मध्ये घेतले होते. परंतु विल्डेरबीस्टची आई मात्र फारशी प्रोटेक्टिव्ह जाणवली नाही, असेलही कदाचित. कारण सिंहीण इतर सिंहिणीची पिलं मायेने सांभाळते. परंतु विल्डेरबीस्ट मात्र दुसरे पिलू जवळ आले की लाथेने मारून घालवते आणि पळण्याचा वेगही ती पिलांसाठी कमी करत नाही. पिलांची दमछाक होताना दिसते. कदाचित जगण्याचे धडे देण्याची या प्राण्याची ही पद्धत असावी. उंचावर घरटी असणारी बारनॅकल बदके आपल्या पिलांसाठी अन्न घरटय़ापर्यंत ना आणता पिलांना बर्ड क्लीफवरून खाली पाण्यात अन्नासाठी उडय़ा मारायला शिकवतात. या प्रकारात बरीच पिले मरतात. जीवनसंघर्षाचा पहिला धडा त्यांना त्यांची आईबाप कुठलीही दयामाया ना दाखवता देतात.

मोठा वाघ आईच्या गळ्यात पडताना पाहिलं की मन भरून येतं. छोटीशी टिबुकली पिलं पाठीवर घेऊन पाण्यात फिरवते. करकोचा चोचीत अन्न पकडून आणतो. पिलांसमोर टाकतो. लेकरं दूध पिताना सिंहीण, हरणी, वाघीण त्याना मायेने चाटते. लहान लेकराचे हात धरून रस्त्यावर चालत जाणारी स्त्र्ााr असो व जंगलात पिलांसह चालणारी कोठलीही प्राणी आई असो, हे दृश्य नेहमीच नजरबंदी करतं.
z [email protected]