शास्त्रज्ञांनी बनवली शेवाळापासून बॅटरी, सहा महिने सलग चालू शकतो कॉम्प्युटर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोणत्याही इलेक्ट्रॉनिक यंत्राला लागणारी अत्यावश्यक गोष्ट म्हणजे बॅटरी. अर्थात त्याला चार्जिंग करावं लागतं. पण, शास्त्रज्ञांनी एक अशी बॅटरी शोधून काढली आहे, ज्यामुळे एक कॉम्प्युटर सहा महिने सलग चालू शकतो.

ही कुलरच्या डब्यासारखी दिसणारी बॅटरी फक्त नेहमीच्या एए बॅटरीइतकीच आहे. पण, यात एक अशी गोष्ट आहे, ज्यामुळे वीजनिर्मिती होऊ शकते. निळ्या आणि हिरव्या रंगाच्या शेवाळापासून ही वीजनिर्मिती होत आहे.

यात काहीही चमत्कार नसून सूक्ष्मजीवांनी केलेली कमाल आहे. या शेवाळाला इलेक्ट्रोडसह एका कंटनेरमध्ये ठेवण्यात आलं असून त्यावरील सूक्ष्मजीव हे सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने वीजनिर्मिती करतात. त्यामुळे या बॅटरीत इतकी वीज निर्माण झाली, की ज्याच्या आधारे एक कॉम्प्युटर सलग सहा महिने चालू शकला.

एनर्जी अँड एनव्हायर्नमेंटल सायन्स जर्नलनुसार, सायनोबॅक्टेरियाने कॉम्प्युटरला 45 युनिटच्या एका चक्रात राहून चालवलं. कॉम्प्युटरने या दरम्यान कामही केलं आणि तो 15 मिनिटं स्टँडबाय मोडवर देखील राहिला. इतकंच नव्हे तर या बॅटरीशी जोडलेला कॉम्प्युटर काढून घेतल्यानंतरही वीजनिर्मिती सुरू राहिली.

निळ्याहिरव्या रंगाचं शेवाळ इलेक्ट्रॉनची निर्मिती करतं. तसंच रात्री ते आपलं भोजन तयार करत असल्याने वीजपुरवठा खंडित होत नाही, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.