
मुंबईतील उष्णतेच्या लाटेमुळे मोनोरेलच्या स्थानकांवर सध्या प्रवाशांना प्रचंड उकाडय़ाचा सामना करावा लागत आहे. त्यात मोनोरेलच्या स्थानकांवरील बरेच पंखे बंद पडलेल्या स्थितीत आहे. तसेच दोन ट्रेनमधील मोठय़ा अंतराने प्रवासी घामाघूम होत आहेत. त्यात जुन्या मोनोरेलच्या टायर आणि सुटय़ा भागांसाठी पुन्हा टेंडर काढावे लागत असून नवीन मोनोरेलच्या गाडय़ा घेण्यासाठी टेंडरची प्रक्रिया अजूनही सुरूच असल्याचे एमएमआरडीएने म्हटले आहे.
देशातील पहिली आणि एकमेव असलेल्या मोनोरेलची सुरुवात फेब्रुवारी 2014 मध्ये झाली होती. चेंबूर-वडाळा-सातरस्ता अशा 21 कि.मी.च्या मार्गावर मोनोरेल चालविली जाते. या मोनोरेलच्या गाडय़ांची संख्या कमी असल्याने सोमवार ते शुक्रवार दोन गाडय़ा दर 18 मिनिटांनी चालविल्या जात असतात. तर रविवारी तब्बल अर्ध्या तासाने एक गाडी येते. त्यामुळे ट्रेन पकडता आली नाही तर प्रवाशांची अर्धा तास रखडपट्टी होत असते. मोनोरेलच्या ट्रेन जुन्या झाल्या असून त्यांची सारखी देखभाल आणि दुरुस्ती करावी लागत आहे.
टेंडरची प्रक्रिया प्रगतिपथावर
मोनोरेलच्या स्थानकांवर पंखे नादुरुस्त असल्यामुळे प्रवासी घामाघूम होत आहेत. तसेच रविवारी मोनोरेलचा मेगाब्लॉक असल्याने कमी फेऱया चालविण्यात येत आहेत. त्यामुळे सोमवार ते शुक्रवार दर 18 मिनिटांनी चालणाऱया गाडय़ा रविवारी मात्र अर्ध्या तासाने धावत असल्यामुळे प्रवासी घामाघूम होत आहेत. त्यात बरेच पंखे बंद पडलेले आहेत. मोनोरेलच्या गाडय़ांचा रंग उडाला असून त्या जुन्या झाल्या आहेत. तसेच गाडय़ांमध्ये हादरेही खूप बसत आहेत. दरम्यान, मोनोरेलच्या मेंटेनन्स व सुटय़ा भागांसाठी टेंडरची प्रक्रिया प्रगतिपथावर असल्याचे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवासन यांनी म्हटले आहे.


























































