
व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या दोघाजणांना पकडण्यात रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले आहे. सुमारे 6 कोटी रुपये किंमतीची पावणेसहा किलो वजनाची उलटी शहराजवळील उद्यमनगर चंपक मैदानाजवळ जप्त करण्यात आली. पोलिसांनी लखनौमधील एका व्यक्तीसह एका स्थानिकाला ताब्यात घेतले आहे.
उद्यमनगर येथील चंपक मैदान येथे दोघेजण व्हेल माशाच्या उलटीची विक्री करायला येणार आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी चंपक मैदानाशेजारी सापळा लावला. दुचाकीवरून दोघेजण चंपक मैदानाजवळ आले. काहीवेळ कोणाचीतरी वाट पहात थांबले होते. इतक्यात पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांच्या दुचाकीच्या डिकीमध्ये व्हेल माशाच्या उलटीचे सफेद रंगाचे तुकडे सापडले. पोलिसांनी ते जप्त केले आणि महंमद जाहीद सय्यद महंमद अत्तार, वय 56 व हमीब सोलकर या दोघांना ताब्यात घेतले. व्हेल माशाची उलटी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या किंमतीने खरेदी केली जाते. ही उलटी सुगंधी द्रव्ये, बॉडी स्प्रे, परफ्युममध्ये वापरली जाते.



























































