वादळी पावसाने पंढरपूर, सांगली, कोल्हापुरला झोडपले; वीजपुरवठा खंडीत, फळांच्या बागा कोसळल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱयासह आलेल्या अवकाळी पावसाने आज पंढरपूर, सांगली आणि कोल्हापूरला झोडपून काढले. वादळी वाऱयामुळे केळीसह द्राक्षबागांचे प्रचंड नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला, तर अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. दरम्यान, या पावसामुळे उकाडय़ाने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

पंढरपूर ः आज आलेल्या वादळी पावसाने पंढरपूर शहर व तालुक्याला झोडपून काढले. दुपारी 3 वाजता आलेल्या वादळी वाऱयाने नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी झाडे, झाडांच्या फांद्या मोडून पडल्या आहेत, तर रस्त्याच्या कडेची काही झाडे उन्मळून पडली आहेत, तर शहरातील मिरची बाजार गल्लीतील विजेचा खांब उन्मळून पडला आहे. यामुळे शहरातील वीजपुरवठा बंद पडला. लक्ष्मी टाकळी – बोहाळी रस्त्यावर झाड पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. या पावसाचा द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका बसला. वादळी वाऱयाने द्राक्षांचे मांडव भुईसपाट झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसामुळे द्राक्षांच्या मण्याची नासाडी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कोल्हापूर ः आज जिह्यात सायंकाळी सहानंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील उकाडय़ाचा त्रास कमी झाला. गेल्या दोन दिवसांपासून जिह्यात पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सायंकाळी जोरदार पावसाची सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत पावसाच्या मध्यम व हलक्या सरी कोसळत होत्या. पावसामुळे जिह्याबाहेरून आलेल्या पर्यटकांसह फेरीवाल्यांची तारांबळ उडाली होती.

सांगली ः जिह्यात गुरुवारी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने झोडपले. मिरज, जत, कवठेमहांकाळ, तासगाव, पलूस, कडेगाव तालुक्यांतील अनेक गावांमध्ये पाऊस झाला. वाऱयाने झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. सांगली शहर परिसरात झालेल्या जोराच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले. वाढत्या तापमानामुळे उन्हाळी पिकांना पाण्याची गरज असताना दमदार पावसाने काहीसा दिलासा मिळाला.

सांगलीतील सखल भागात दलदल

सांगली शहर परिसराला पावसाने झोडपून काढले. दीडतास दमदार पाऊस पडल्याने सखल भागात पाणी साचून राहिले. प्रामुख्याने गुंठेवारी भागात दलदलीचेच साम्राज्य होते. रस्त्यावरील खड्डय़ांत पाणी साचल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत होती. रात्रीपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती.