
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी शुक्रवारी सकाळी ट्विट करून याची माहिती दिली.
#अयोध्या #Ayodhya pic.twitter.com/rFbkDT9Is1
— Raj Thackeray (@RajThackeray) May 20, 2022
राज ठाकरे हे 5 जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र आता हा दौरा स्थगित करण्यात आला आहे. त्यांच्या या दौऱ्याला पैसरगंजचे भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी तीव्र विरोध केला होता. राज ठाकरे यांना अयोध्येमध्ये पाऊल ठेऊ देणार नाही असे म्हणत त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शनही केले होते.
राज ठाकरे यांच्या पक्षाच्या लोकांनी गर्भवती महिलांनाही सोडले नाही. मजुरांना मारहाण केली, विद्यार्थ्यांना परीक्षा देऊ दिली नाही, हे आठवल्यावर संताप उफाळून येतो. मजुरांना मारहाण करून, त्यांना कोंबडा बनवून आता ते अचानक रामभक्त झाले आहेत. आपल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रामध्ये उत्तर भारतीयांना त्रास होणार नाही. ते सक्षम असून महाराष्ट्रात कायदा आपले काम करेल. राज ठाकरे यांची दादागिरी चालणार नाही, असे बृजभूषण सिंह यांनी म्हटले होते.
तसेच राज ठाकरे हे देशभरात खलनायक बनले असून रावणाची जेवढी निंदा होते तेवढीच सध्या त्यांची देशभरात होत आहे. त्यांना नायक बनायचे असेल तर त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी. हिंदुस्थानची जनता त्यांना मोठ्या मनाने माफ करेल. हीच संधी आहे, ही संधी सोडली तर ते आयुष्यात बिहार, झारखंड, उत्तर प्रदेशमध्ये येऊ शकणार नाहीत. एक बृजभूषण नाही तर करोडो बृजभूषण त्यांच्याविरोधात उभे राहतील, असेही बृजभूषण सिंह यावेळी म्हणाले होते.
छटी का दूध याद दिलाएंगे
उत्तर प्रदेशमधील नंदिनी नगर येथे आयोजित सभेत महंतांनी राज ठाकरे यांना एका आठवडय़ात माफी मागा, अन्यथा ‘छटी का दूध याद दिलाएंगे’ असा थेट इशारा दिला होता. सभेत उपस्थित महंत म्हणाले, ‘‘माझ्या हातात धर्मदंड आहे. आम्ही राज ठाकरे यांना हे सांगायला आलो आहोत की, त्यांनी याआधी उत्तर भारतीयांचा जो अपमान केलाय त्यासाठी माफी मागावी. राज ठाकरे यांनी माफी मागितली तर त्यांचं स्वागत होईल. त्यांनी माफी मागितली नाही तर त्यांना ‘छटी का दूध याद दिलाएंगे.’ उत्तर भारतीयांचा अपमान करणारा कोणीही ‘माई का लाल’ जन्माला आलेला नाही. राज ठाकरे यांनी माफी मागितली नाही तर त्यांचं वेगळय़ा पद्धतीने स्वागत केलं जाईल. आमची त्यासाठी संपूर्ण तयारी आहे. उत्तर भारतीयांचा जनसमुदाय राज ठाकरे ज्या दिवशी उत्तर प्रदेशमध्ये येतील त्या दिवसाची वाट पाहत आहे,’ असे महंत म्हणाले.



























































