
माहीम सार्वजनिक वाचनालयाचा 45 वा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. दिवंगत प्रमोद निफाडकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ याप्रसंगी साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच ज्येष्ठ साहित्यिक पै.अनंत मनोहर यांच्या साहित्यावरील रसग्रहणात्मक लेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सामरंभही पार पडला.
ज्येष्ठ पत्रकार श्रीराम सिधये यांनी साहित्यिकांच्या आठवणी जागवणारा ‘यांचा विसर न व्हावा…’ हा कार्यक्रम सादर केला. तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी पु. भा. भावे, ग. रा. कामत, व्यंकटेश माडगूळकर, अनंत काणेकर या साहित्यिकांच्या आठवणींनादेखील उजाळा दिला. अनंत मनोहर यांच्या आठवणी सांगताना ते म्हणाले, त्यांच्यात उमदेपणा होता. लहानांशी ते सहजपणे संवाद साधायचे शिवाय त्यांच्या कोणत्याही लेखनावर कधीही कुणीही आक्षेप घेऊ शकलेला नाही. त्यांनी लहानपणापासून अनेक जंगले बघितली होती. तेथील निसर्गसौंदर्याचा बारकाईने अभ्यासही त्यांनी केला होता. अशा काही आठवणींद्वारे त्यांनी अनंत मनोहरांच्या लेखनविषयक वैशिष्टय़ांच्या उलगडा श्रोत्यांशी साधलेल्या संवादातून केला.
वर्धापन दिनानिमित्त वाचनालयाने ज्येष्ठ साहित्यिक अनंत मनोहर यांच्या राब, अरण्यकांड आणि दोन मुठी तांदूळ या कादंबरींवर आधारित रसग्रहण स्पर्धा आयोजित केली होती. या साहित्यकृतींच्या रसग्रहणात्मक लेखन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. यामध्ये ‘अरण्यकांड’ या कादंबरीसाठी नाशिक येथील अलका कोठावदे यांना प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक नमिता वारणकर, तृतीय क्रमांक वेदश्री प्रधान तसेच उत्तेजनार्थ पहिले पारितोषिक रेखा राजाध्यक्ष आणि ’राब’ या कादंबरीसाठी उत्तेजनार्थ दुसरे पारितोषिक अर्चना आरस यांना देण्यात आले.































































