लेख – मुक्ताई मुक्त जाली!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नामदेव सदावर्ते

महाराष्ट्रात ज्या स्त्री संत आपल्या कर्तृत्वाने अजरामर झाल्या त्यात संत मुक्ताबाईंचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. ज्यांनी आध्यात्मिक साहित्यात मोलाची भर घातली, संतश्रेष्ठ ज्ञानदेव, सोपानदेव आदी अलौकिक भावंडांचे वलय त्यांना लाभले, त्या ज्ञानेश्वरांच्या भगिनी म्हणजेच संत मुक्ताबाई. संत मुक्ताईंनी रचलेले ‘ताटीचे अभंग’ प्रसिद्ध आहेत. 725 वर्षांपूर्वी वैशाख वद्य दशमीला संत मुक्ताबाई अंतर्धान पावल्या होत्या, त्यानिमित्त…

संत नामदेवरायांच्या अभंगगाथेत संतांच्या समाधी सोहळय़ांचे सविस्तर वृत्त नामदेवांनी अभंगबद्ध केले आहे. कार्तिक मासात संत ज्ञानेश्वरांचा संजीवन समाधी सोहळा आळंदीस झाला. नंतर मार्गशीर्ष महिन्यात संत सोपानदेवांचा समाधी सोहळा सासवड येथे झाला. या दोन्ही सोहळय़ांचे सविस्तर वर्णन तेही भावभक्तीपूर्वक करण्यात आले. तसेच पुढील प्रकरणात संत नामदेवांनी संत चांगदेवांच्या समाधी सोहळय़ाचे वर्णन केले आहे. चांगदेवांच्या पूर्वचरित्रात अहंकारयुक्त अज्ञान होते. ते अज्ञान दूर करून त्यांस आत्मज्ञान समजावून सांगण्यासाठी संत ज्ञानेश्वरांनी पासष्ट ओव्यांचे उपदेशपत्र लिहून पाठविले, पण त्या पासष्ट ओव्यांचा अर्थ न समजल्याने चांगदेवांना ज्ञानदेवादी भावंडांचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याची इच्छा झाली. वाघावर बसून ज्ञानराजाला भेटायला येणाऱ्या चांगदेवास दगड-मातीच्या भिंतीवर बसून आकाशमार्गे सामोरे जाणारे ज्ञानदेवादी भावंडे अपार कृपाळूपणे उपदेश करीत होते. शेवटी मुक्ताबाई व सोपानदेवांनी चांगदेवास गुरूउपदेश दिला. चांगदेव ज्ञानदेवादी भावंडांचे एकनिष्ठ भक्त झाले. अखेरपर्यंत चांगदेवांनी गुरूभक्ती केली. चांगदेवांच्या समाधीप्रसंगी सर्व संतांना अपार दुःख झाले. निवृत्तीनाथ श्री विठ्ठलांच्या गळय़ास मिठी मारून रडू लागले. चांगदेवांच्या समाधी सोहळय़ानंतर सर्व संत मंडळी पाच दिवस समाधीजवळ हरिकीर्तन करीत थांबले.

निवृत्तीनाथ देवास म्हणाले, आता आपण सारे नेवासे येथे म्हाळसापुरी जाऊ, जेथे ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीची रचना केली. निवृत्ती आणि मुक्ताबाईच्या इच्छेनुसार सर्व जण नेवासे येथे आले. संत नामदेवराय म्हणतात-

तेथोनि वैष्णव आले नेवाशासी ।

सहसमुदायेंसी देवराय ।।

तेथे म्हाळसामाता, महालयादेवी व मोहिनीराजाची यथासांग पूजा करण्यात आली. तेथून सर्व जण आपेगावी आले. मुक्ताईस आपली मायभूमी पाहून कंठ दाटून डोळय़ांत अश्रू आले. ज्ञानेश्वर व सोपान यांच्या वियोगाने मुक्ताई खूप उदास झाली. आता हे शरीर सांभाळून काय करावे? असे म्हणून मुक्ताईने अन्नत्याग केला. नामदेवराय ते दुःख व्यक्त करतात-

मुक्ताई उदास जाली असे फार ।

आतां हे शरीर रक्षूं नये ।।

त्यागिले आहार अन्नपाणी सकळ ।

निवृत्तीराज तळमळी मनामाजी ।।

निवृत्तीनाथ पंढरीनाथांना म्हणतात- हे देवा, आता मुक्ताईस जास्त जपावे लागेल. तिची चित्तवृत्ती स्थिर नाही. ती स्वस्वरूपी निमग्न झाली आहे. तिला देहभानच राहिले नाही. उदास मुक्ताईस पांडुरंग व निवृत्ती दोघामध्ये घेऊन चालत राहिले. नामदेवराय म्हणतात-

तापीचिये तीरी महग्राम थोर ।

असे सोमेश्वर पुरातन ।।

वद्य वैशाखमास दशमी निर्मळ ।

उष्णकाळ फार तापतसे ।।

ज्या भूमीवर परशुरामांनी बाण मारला होता, ते स्थान पुरातन असून पश्चिमेस आहे. ते तापी नदी तीरावर सर्वांनी पाहिले. सर्व वैष्णव तेथे थांबले. विशाल तापीतीर मनोहर दिसत होता. मार्कण्डेय ऋषींनी येथे तपश्चर्या केली होती. नामदेवराय या स्थळाचे वर्णन करताना म्हणतात- येथील अनेक कर्दळीची झाडे जणू सोन्यासारखी दिसतात. जिकडेतिकडे रानकेळी दिसत आहेत. निसर्गात सर्वत्र आनंद दिसत होता. उष्णकाळ असल्याने सावली सर्वांना प्रिय आहे. सावलीत मन स्थिर करता येते.

निवृत्तीनाथ मुक्ताईस म्हणाले- हे मुक्ते, तू कधी जाण्याचे ठरविले आहे? त्यावर महायोगिनी मुक्ताबाई म्हणते. नामदेवराय एका अभंगात ते सांगतात-

मुक्ताई म्हणे जावे यावे कोठे ।

अवघे निघोट स्वरूप स्वामी ।।

गर्जता गगन कडाडली वीज ।

स्वरुपी सहज मिळयेली ।।

मावळला दीप ज्योत कोठे होती ।

सहज सामावती निरंजनी ।।

नामा म्हणे हरी जाईल पाहता ।

ऐसे माझे चित्ता कळो आले ।।

मुक्ताई म्हणतात- हे देवा, आमच्या स्वस्थानी अंधार नाही. सारे चराचर सर्वत्र प्रकाशाने भरले आहे. उदय आणि अस्त स्वरूपाला नाही. संत व ऋषीमुनी हे सर्व जाणतात. आम्ही येथे स्वरूप सोडून आलो नाही. म्हणून स्वरूप सोडून कोठे जाण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही आतबाहेर भगवंतस्वरूप असून, त्यानेच हा ज्ञानदीप उजळला आहे. वैशाख कृष्ण दशमी या तिथीस सारे संतजन, ऋषीमुनी, पांडुरंग व निवृत्ती सारे तापीतीरावर स्नानासाठी गेले.

टाळ-मृदंगाच्या सुस्वर गायनाने व नामाच्या जयजयकाराने दाही दिशा उजळल्या. प्रलयकाळाप्रमाणे प्रचंड विजा चमकू लागल्या. दाही दिशा धुंद झाल्या. प्रचंड सोसाटय़ाचा वारा सुटला. सर्व जण स्नान करून आले. सर्वत्र अंधारून आल्यामुळे सर्व दिशा अंधारमय झाल्या होत्या. विजा लखलखतच होत्या.

नामा म्हणे देवा जाली कैसी गती ।

पडलीसे भ्रांती अवघ्या जना ।।

निवृत्तीनाथ देवांना म्हणाले- हे देवा, हा इतका जोराचा वारा सुटला आहे. जणू हा प्रलयकाळाचा वारा वाटतो. सर्वांचेच देहभाग नष्ट झाले आहे. सर्वांचे डोळे आपोआप झाकले जात आहेत. माध्यान्ह वेळीच आभाळ भरून आले आहे. निवृत्ती, राही, रुक्माई मुक्ताईला धरून सांभाळत चालत आहेत. संत, ऋषीमुनी देवाला म्हणतात, हे देवा, हे विघ्न आपणच दूर करा. सर्वांना आपला मृत्यू समोर दिसत आहे. नामदेवराय म्हणतात-

कडाडली वीज निरंजनी जेव्हां ।

मुक्ताई तेव्हां गुप्त जाली ।।

वैकुंठी लक्ष घंटा वाजती एक घाई ।

जाली मुक्ताई स्वरूपाकार ।।

एक प्रहर झाल्यावर अंधार दूर झाला. सर्वत्र प्रकाश पसरला. ढग नष्ट झाले. उघडल्या दिशा, उघडले गगन. सूर्य सर्वांना दिसला, पण मुक्ताई कोणालाही दिसली नाही. देवासह सारे दुःखी झाले. बरोबर 725 वर्षांपूर्वी वैशाख वद्य दशमीला मुक्ताई मुक्त झाली.