
>> प्रा. डॉ. प्रकाश खांडगे
मुंबई दूरदर्शन म्हणजे आताच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवरील प्रख्यात वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांची ही एक्झिट महाराष्ट्रातील तमाम मराठी जनांना चटका लावणारी अशीच आहे. प्रदीप भिडे दिलखुलास आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जायचे. त्यांचे आणि माझे स्नेहबंध जवळ जवळ पंधरा वर्षांचे. हिंदुस्थान युनिलिव्हर या बहुराष्ट्रीय कंपनीत भिडे कम्युनिकेशन मॅनेजर होते आणि मी कम्युनिकेशन असिस्टंट होतो. कंपनीमध्ये ते माझे वरिष्ठ असले तरी बाहेर त्यांचे आणि माझे मैत्रीचे संबंध होते. त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे महाराष्ट्रातील ग्रामीण भागाबद्दल त्यांना विशेष आपुलकी होती. त्यांचे आई-वडील रयत शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे भिडे यांचे शिक्षण ग्रामीण भागात झाले. त्यातल्या त्यात खंडोबाचे प्रसिद्ध स्थान असलेल्या धामणी या गावी त्यांचा शालेय शिक्षणाचा बराच काळ गेला. मी ‘खंडोबाचे जागरण’ यावर संशोधन केल्याचा भिडे यांना अभिमान वाटायचा. ई मर्क, हिंदुस्थान युनिलिव्हर अशा बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करणाऱया प्रदीप भिडे यांची खरी ओळख दूरदर्शनवरील वृत्तनिवेदक आणि नाटय़ कलावंत अशीच होती. जनसंपर्क खात्याचे जटील आणि तणावपूर्ण काम करीत असतानाही त्यांनी ‘बायकोचा गजरा’ या नाटकाचे प्रयोग सातत्याने केले. वृत्तनिवेदन आणि व्हॉइसिंगच्या जगतातले भिडे ‘बिग बी’ होते. दूरदर्शनसहित अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर भिडे यांचा आवाज अवघ्या महाराष्ट्राने ऐकला आहे. बातमीच्या आशयानुसार भिडे भाव आणि रस बातमीतून व्यक्त करत. त्यांचा आवाज भारदस्त असे, पण या भारदस्त आवाजातही ते आशयानुसार ते लाघव, मार्दव, धीरगंभीरता बातम्या देताना व्यक्त करीत. ते अजातशत्रू होते, दिलखुलास होते. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लोककलावंतांबद्दल त्यांना विशेष आस्था असे. दिवंगत ज्येष्ठ पत्रकार माधवराव गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप भिडे आणि मी तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांचा सावकाराकडे गहाण पडलेला तंबू सोडविण्यासाठी मोहीम उघडली. विठाबाईंना कर्जमुक्त केले आणि एशियाटिक सोसायटी टाऊन हॉलमध्ये विठाबाईंचा तमाशाचा कार्यक्रम दुर्गाबाई भागवत यांच्या पुढाकाराने आयोजित केला. भिडे यांनी ग्रामीण जीवनाशी असलेली आपली नाळ कायम ठेवली. अभिजन आणि ग्रामजन या दोन्ही पातळ्यांवर भिडे लोकप्रिय होते. वृत्तपत्रसृष्टी तसेच दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील पत्रकारांशी त्यांचा संपर्क दांडगा होता. केवळ वृत्तनिवेदक म्हणून नव्हे, तर एक आदर्श जनसंपर्क अधिकारी म्हणूनदेखील त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा मल्टिनॅशनल कंपन्यांच्या जगतामध्ये उमटविला होता. विश्वास मेहेंदळे, आकाशानंद, रत्नाकर मतकरी, सुहासिनी मुळगावकर अशा मान्यवरांचा सहवास लाभलेले भिडे नाटय़सृष्टीत वसंत सोमण, दिलीप प्रभावळकर, प्रतिभा मतकरी अशा अनेक सहकलाकारांसोबत अनेक नाटकांमधून झळकले. त्यांनी काही काळात नाटय़ समीक्षणदेखील केले. पंतप्रधान, राष्ट्रपतींचे कार्यक्रम आयोजित झाले असले की, भिडे हमखास सूत्रसंचालन करीत असत. त्यांच्या सूत्रसंचालनामध्ये भारदस्तपणा आणि आदब होती. सूत्रसंचालक हा कार्यक्रम यशस्वी करण्यातला एक महत्त्वाचा दुवा असतो, पण सर्व कार्यक्रम हायजॅक करण्याचा आगाऊपणा सूत्रसंचालकाने करू नये अशी भिडेंची भूमिका असे. प्रदीप भिडे यांचे प्रदीर्घ आजाराने जाणे सर्वांसाठीच वेदनादायी आहे.




























































