
यंदाच्या आषाढी वारीसाठी 15 लाखांवर भाविक येण्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. वारकऱयांना गर्दीच्या काळात मदत व्हावी म्हणून पंढरपूर मंदिर समितीने प्रथमच ‘पंढरीची वारी’ हे मोबाइल ऍप तयार केले आहे. त्यावर वारीकाळात प्रशासनाकडून सोलापूर जिल्हा व पंढरपुरात वारकऱयांना पुरवण्यात येणाऱया सुविधांची माहिती मिळेल. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 6 विद्यार्थ्यांनी दीड महिन्यांत या ऍपची निर्मिती केली आहे. प्ले स्टोअरवर ‘पंढरीची वारी’ या नावाने हे ऍप उपलब्ध आहे.
पंढरपूर येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभागातील सुदर्शन मकर, आशुतोष देशपांडे, गौरांग मुळे, अभिजित नलवडे, सैफ शेख व मोहित मुजावर या विद्यार्थ्यांनी हे ऍप तयार केले आहे. आगामी काळात हेल्पलाइन क्रमांक, गॅस सिलिंडरची सुविधा, एसटी, रेल्वेचे वेळापत्रक याचाही ऍपमध्ये समावेश करण्यात येणार असल्याचे टीमप्रमुख मकर यांनी सांगितले.
यंदा आषाढी वारीमध्ये वारकऱयांची मोठी गर्दीची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ऍपबाबत कल्पना सुचविली. वारकऱयांना सुविधा पुरविताना प्रशासनावर मोठा ताण येतो. पाणी, शौचालय, हॉस्पिटल या सुविधा देण्यासाठी ऍप महत्त्वाची भूमिका बजावेल. ऍपमध्ये गरजेप्रमाणे आणखी बदल केले जाणार असल्याची माहिती मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.
पालखी सोहळ्याचा सोलापूर जिह्यात प्रवेश झाल्यानंतर या ऍपचा वापर करता येणार आहे. शिवाय पंढरपूर येथे सर्व पालख्या पोहोचल्यानंतरही हे ऍप दिशादर्शक ठरणार आहे. विठ्ठल मंदिराकडे जाण्याच्या मार्गाबरोबरच महत्त्वाची ठिकाणे दाखवली जाणार आहेत. पालखीची मुक्कामाची ठिकाणे, विसावा या ठिकाणी असलेल्या सुविधा या ऍपवरून शोधणे सोपे होणार आहे.
वारी मार्ग ते पंढरपूर शहरात पोहोचेपर्यंत हे ऍप उपयोगी ठरणार आहे. वारी मार्गावर पिण्याच्या पाण्याचे टॅँकर, शौचालय, जवळील शासकीय कार्यालये, पोलीस ठाणे, हॉस्पिटल, मंदिर, वाहनतळ, शाळा या गोष्टी ऍपवर दिसतील. मुक्कामाच्या ठिकाणी वा दिंडी मार्गक्रमण करताना वारकऱयांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. वारकऱयांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर समिती व्यवस्थापनाने हे ऍप विकसित केले आहे.



























































