
एसटी बस आणि टेम्पोच्या धडकेत टेम्पोचालकाचा मृत्यू झाला असून, दोन्ही वाहनांतील तीन ते चार प्रवासी जखमी झाले आहेत. शेवगाव-गेवराई राज्यमार्गावरील राक्षी गावाजवळ शनिवारी ही घटना घडली आहे.
जावेद इलियास शेख (वय 34, रा. संजयनगर, गेवराई, जि. बीड) असे मृत टेम्पोचालकाचे नाव असून, त्यांच्यासोबत प्रवास करणारे सचिन अजिज बागवान (वय 27) यांच्यासह बसमधील शेख अलीला अहमद (वय 50 रा. पाथर्डी) व आकाश रोटे (वय 20) हे किरकोळ जखमी झाले आहेत. नगर येथून सुटलेली नगर ते पुसद बस शेवगाव येथून पुसदकडे जात होती, तर शेवगावकडे निघालेला टेम्पो राक्षी गावानजीकच्या पेट्रोलपंपाजवळ आला असताना या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यात जावेद शेख यांचा जागीच मृत्यू झाला.





























































