इन्स्टाग्राम वापरताय… आधी वयाचा पुरावा द्या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मीडियाच्या वापराबाबत अनेकदा चिंता व्यक्त केली जाते. सोशल मीडिया हे माध्यम मुलांना कसे त्रासदायक आहे या दृष्टीने चर्चा होताना दिसतात. या पार्श्वभूमीवर इन्स्टाग्राम खास पावले उचलण्याच्या तयारीत आहे. पालकांच्या चिंतेचे निराकरण करण्यासाठी युजर्सचे वय 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असल्याचा पुरावा मागू शकते. त्यासाठी अमेरिकेत नवीन पर्यायाची चाचणी केली जात असल्याचे इन्स्टाग्रामने गुरुवारी जाहीर केले. एकतर फोटो आयडी अपलोड करून, व्हिडीओ सेल्फी रेकॉर्ड करून किंवा म्युच्युअल फ्रेंडना वयाची पुष्टी करण्यास सांगितले जाऊ शकते.

सोशल मीडिया आणि मानसिक स्वास्थ्य हा विषय नेहमी चर्चेत असतो. इन्स्टाग्रामचा वापर करणाऱया तरुण युजर्सच्या वयाची कठोर तपासणी केली जाते. अनेक सूचना आणि तक्रारीनंतर कंपनीने फॅमिली सेंटरसारखी साधनं आणली आहेत.
आता लंडन येथील एका कंपनीला व्हिडीओ सेल्फी पाठवून आर्टिफिशियल इंटीलिजन्सच्या आधारे चेहऱयाच्या वैशिष्टय़ांवरून वयाचा अंदाज लावला जाणार असल्याचे इन्स्टाग्रामने सांगितले. हे तंत्रज्ञान वय वगळता इतर कोणतीही ओळख करू शकणार नाही. वयाची पुष्टी झाल्यावर व्हिडीओ सेल्फी हटवले जाणार आहेत. इन्स्टाग्रामवर साइन अप करताना वय सांगणे आवश्यक असते. साइन अपसाठी किमान वय 13 वर्षे आहे.

– एखाद्याचे वय ऑनलाइन समजून घेणे ही खूप गुंतागुंतीची आणि वेळ खाणारी आव्हानात्मक प्रक्रिया आहे. वयाच्या ऑनलाइन पडताळणीसाठी स्पष्ट मानके ठरवण्यासाठी आमच्या उद्योगातील इतरांसमवेत आणि सरकारसोबत काम करायचे आहे, असे ‘मेटा’ कंपनीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.