नाद-मराठी- …सांगे गोड कहाणी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अरुण जोशी

मराठी  गानविश्वच नव्हे तर संपूर्ण देशाला गानसंस्कार देण्याचं अभूतपूर्व कार्य अनेक मराठी कलाकारांनी केले… मुंबईत प्रा. देवधर किंवा गायनाचार्य पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी गाणं जनसामान्यांपर्यंत पोहोचवलं. याशिवाय पारंपरिक गीतं, लोकगीतं यांचे सूर मराठी मुलखात निनादत होतेच. संगीत नाटकांचा जमाना सुरू झाला त्याच काळात देशात दळणवळणाची वेगवान साधनं आली. त्यामुळे अनेक प्रांतातले संगीतकार, गायक आपली प्रतिमा देशव्यापी सहजतेने करू शकले.

त्यातच बोलपटांचा आणि त्याबरोबर पार्श्वगायनाचा काळ सुरू झाला आणि मुंबई हे हिंदी सिनेनिर्मितीचं केंद्र बनलं. चित्रपटांसाठी लागणारे दोन अद्वितीय स्वर तर इथलेच. भारतरत्न लता मंगेशकर आणि सूरसम्राज्ञी आशा भोसले. बाकीचे दिग्गज गायक (आणि गायिका) हळूहळू चित्रपटांची मायानगरी असलेल्या मुंबईत दाखल झाले. त्यांचा संपर्क इथल्या संस्कृतीशी, मराठीतल्या संपन्न गायन परंपरेशी आलाच. भावगीत हे मराठीचं खास वैशिष्टय़. अनेक इतर भाषिक गायक, गायिकांनी मराठी ध्वनिमुद्रिकांसाठी स्वर दिला. कोणी मराठी चित्रपटांसाठी गायन केलं. अशाच कलाकारांचा परिचय आपण या लेखमालेतून करून घेत आहोत. यापैकी बहुतेकांची गाणी मराठी रसिकांच्या मनात कायमची रुजली.

‘बिब्बं घ्या बिब्बं शिकेकाई, आज आले उद्या मी येणार बी न्हाई, अवंदा लगीन करायचं हाय मला, देखना नवरा हवा गं…’ हे दादा कोंडके यांच्या ‘सोंगाडय़ा’ चित्रपटातलं अत्यंत ठसकेबाज गाणं आठवतंय ना? गायिका होत्या कृष्णा कल्ले! गीताचे बोल होते जगदीश खेबुडकरांचे आणि संगीत राम कदम यांचं. यांच्या अभिनयाने नटलेलं हे गीत त्यावेळी तर खूपच गाजलं. अशी कितीतरी म्हणजे सुमारे 165 मराठी गीतं, गोड गळय़ाच्या गायिका कृष्णा कल्ले यांनी गायली. त्यातल्या निवडक गीतांची मनाशी उजळणी करूया.

पण त्याआधी त्यांचा थोडासा परिचय. 18 जुलै 1940 रोजी कृष्णा कल्ले यांचा जन्म कारवार येथे झाला. म्हणजे घरचे भाषिक संस्कार कोकणी, कानडी, मराठी असे संमिश्र असणार, पण अगदी लहान असतानाच त्यांचं कुटुंब उत्तर प्रदेशात कानपूरला स्थायिक झालं आणि अर्थातच हिंदी भाषिक वातावरणात कृष्णा यांचं शिक्षण झालं. गाण्याची आवड आणि गोड आवाजाची उपजत देणगी असल्याने त्या गाणं शिकायला लागल्या.

वयाच्या अठराव्या वर्षीच त्यांना कानपूर येथे आकाशवाणीवर गाण्याची संधी मिळाली. गानकारकीर्द बहरण्यासाठी मुंबई गाठणं महत्त्वाचं होतं. कृष्णा कल्ले मुंबईत आल्या आणि रेशमी सुरांचे गायक अरुण दाते यांच्याशी त्यांचा परिचय झाला. त्यातूनच संगीतकार यशवंत देव यांची भेट झाली. देवांकडे त्यावेळी कविवर्य ना. घ. देशपांडे (1930 च्या दशकात ध्वनिमुद्रित झालेलं पहिलं मराठी भावगीत ‘रानारानात गेली बाई शीळ’ हे ना. घ. देशपांडे यांचंच) यांचं एक भावगीत देव यांच्याकडे होते. ‘मन पिसाट माझे अडले रे, थांब जरासा’ ते गाणं त्यांनी कृष्णा कल्ले यांच्याकडून गाऊन घेतलं. अप्रतिम चाल आणि टिपेला लागलेला स्वर यामुळे ते गाणं अतिशय गाजलं. आजही ते ऐकताना तेवढाच आनंद मिळतो.

याच काळात त्यांना अनेक मराठी संगीतकारांकडे गाण्याची संधी लाभली. काही चित्रपटगीतंही मिळाली. कृष्णा कल्ले यांनी गायलेली ही गाणी तुम्हालाही नक्कीच आठवतील. ती फोनमध्ये जरूर ऐका. ना. घ. देशपांडे यांचंच ‘तुझ्याचसाठी कितीदा’ या त्यांच्या गाण्याला संगीत यशवंत देव यांचंच आहे. ग. दि. माडगूळकर यांची ‘मैनाराणी चतुर शहाणी’  (सं. यशवंत देव), ‘उठ शंकरा सोड समाधी’ (सं. दत्ता डावजेकर), जनकवी पी. सावळाराम यांची ‘गोड गोजिरी लाज लाजरी’ (सं. हृदयनाथ मंगेशकर) आणि ‘चंद्रकळा रुक्मिणी नेसली’ (सं. विश्वनाथ मोरे), ‘गोड गोजिरी’मध्ये त्या उषा मंगेशकर यांच्या सहगायिका होत्या. ‘अशा या चांदराती’ आणि ‘चंद्र अर्धा राहिला’ ही मधुकर जोशी यांची गीतं (सं. विठ्ठल शिंदे आणि यशवंत देव) तसेच देवांचं संगीत असलेलं ज. के. उपाध्ये यांचे ‘कुणी काही म्हणा’ ‘तू अबोल होऊन जवळी मजला घ्यावे (गुरुनाथ शेणई – सं. श्रीनिवास खळे), परिकथेतील राजकुमारा (वंदना विटणकर – सं. अनिल मोहिले) पुनवेचा चंद्रम आला नभी (शांता शेळके – सं. बाळ पार्टे) पत्र तुझे ते येता अवचित या गोड भावगीताचे शब्द रमेश अणावकरांचे तर संगीत बाळ चावरे यांचं ‘श्रीरंग सावळा तू’ या शांताराम नांदगावकर यांच्या गीताचे संगीतकार अनिल मोहिले अशा अनेक गीतकार संगीतकारांची उत्कृष्ट गीतं कृष्णा कल्ले यांनी रसिकांपर्यंत पोहोचवली.

अशा या गुणी गायिकेचा सन्मान मुंबईत झाला तो वसुधा कुलकर्णी यांनी लिहिलेल्या ‘कृष्णा कल्ले ः एक कृतार्थ गानप्रवास’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या समारंभात. त्यावेळी ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव, अनिल मोहिले, गायक अरुण दाते अशी दिग्गज मंडळी उपस्थित होती. कृष्णाताई त्यावेळी काही गायल्या नव्हत्या. पण त्यांच्या उपस्थितीनेच रसिकश्रोत्यांना आनंद झाला होता. या गोष्टीलाही आता बरीच वर्षे झाली. 2015 मध्ये कृष्णा कल्ले हे जग सोडून गेल्या, पण आपले मधाळ स्वर रसिकांसाठी मागे ठेवून!