सातारा विभागातून आषाढीसाठी 175 एसटी बसेसची सोय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंढरपूर येथील आषाढी एकादशी सोहळय़ासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा सातारा विभाग सज्ज झाला आहे. जिह्यातील सर्व आगारांतून पंढरपूर येथे वारकरी व प्रवाशांसाठी जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. सुमारे 175 बसेस वारकऱयांच्या सेवेसाठी सोडण्यात येणार आहेत.

रविवारी (दि. 10 जुलै) आषाढी एकादशी असल्याने पंढरपूर येथे मोठय़ा प्रमाणात यात्रा भरते. गेली दोन वर्षे कोरोनामुळे आषाढीचा सोहळा झाला नाही. मात्र, यावर्षी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांचा पायी पालखी सोहळा सुरू झाला असून, दोन्ही सोहळ्यांमध्ये वारकरी मोठय़ा संख्येने सहभागी झाले आहेत. सातारा जिह्याच्या विविध ठिकाणांहून पंढरपूर येथे जाणाऱया भाविकांसाठी महामंडळाच्या सातारा विभागामार्फत जादा एस. टी. सोडण्याचे नियोजन केले आहे.

माऊलींचा पालखी सोहळा दि. 28 जून ते 4 जुलै असा सातारा जिह्यातून मार्गक्रमण करणार आहे. माउलींच्या दर्शनासाठी वारकरी व भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी विविध आगारांतून सुमारे 100 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. पालखी सोहळा मुक्कामाच्या ठिकाणी व त्या परिसरात असणाऱया अन्य गावांसाठी या बसेस धावणार आहेत. गावांमधील 40 वारकऱयांच्या समूहाने एसटीचे बुकिंग केल्यास त्याच गावातून एसटी सोडण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.