राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराच्या निकषात बदल, निर्व्यसनी शिक्षकालाच आदर्श शिक्षक पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराच्या निकषात शालेय शिक्षण विभागाने बदल केला आहे. यापुढे आदर्श शिक्षक पुरस्कार हा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने दिला जाणार आहे. तसेच सलग दहा वर्षे शिक्षक, मुख्याध्यापकपदी सेवा पूर्ण करणारे, कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशी सुरू नसलेल्या निर्व्यसनी शिक्षकांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. तसेच मागील सलग 5 शैक्षणिक वर्षांत शिक्षकांनी किती शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणले, याची दखलही पुरस्कारासाठी घेतली जाणार आहे.

शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णयाद्वारे आदर्श शिक्षक पुरस्काराचे सुधारित निकष नुकतेच जाहीर केले. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याविषयीची माहिती दिली. राज्यातील समर्पित शिक्षकांचा योग्य सन्मान करण्यासाठी दिल्या जाणाऱया आदर्श शिक्षक पुरस्कारांच्या निकषांना अधिक शिक्षकाभिमुख केले असून घरोघरी शिक्षणाची ज्योत पेटवणाऱया क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावे हा पुरस्कार दिला जाणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. राज्यातील एकूण 109 शिक्षकांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. प्राथमिक शाळेतील 38, माध्यमिक 39, आदिवासी क्षेत्र 19, आदर्श शिक्षिका 8, विशेष शिक्षक (कला, क्रीडा) 2, दिव्यांग शिक्षक 1, स्काऊंट गाईड 2 या प्रमाणात जिल्हा निवड समितीने राज्य निवड समितीकडे पुरस्कारासाठी शिफारशी पाठवायच्या आहेत. पुरस्काराची निवड प्रक्रिया माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी शिक्षकाने सादर केलेली माहिती खोटी असल्यास अशा शिक्षकांचा प्रस्ताव रद्द करण्यात येणार आहे.

शिक्षकांसाठी हे असतील पात्रता निकष

आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा पुढचा टप्पा
शैक्षणिक संशोधनपर निबंध, प्रबंधास पुरस्कार
वृत्तपत्र व प्रसिद्ध नियतकालिकात प्रकाशित पाच लेख
शिक्षक शिकवीत असलेल्या विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील पुरस्कार
सामाजिक, शैक्षणिक, आपत्ती व्यवस्थापन, राष्ट्रीय कार्यात सहभाग
राज्य, राष्ट्रीय शिष्यवृत्ती, नवोदय, प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल
शाळेच्या उन्नतीसाठी शिक्षकांनी मिळविलेली रक्कम
डिजिटल शैक्षणिक साहित्य निर्मिती
विद्यार्थ्यांची अध्ययन प्रगती