
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गट व गणांच्या प्रभागरचनेवरील हरकती व आक्षेपांकरून जिल्हाधिकाऱयांनी या रचनेत काही बदल करून अंतिम प्रभागरचना जाहीर केली आहे. आता गट – गणात आरक्षण काय पडणार, त्यावर इच्छुकांची गणिते अवलंबून आहेत. ओबीसी आरक्षण वगळून खुल्या प्रवर्ग महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गांची लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणे काढली जाणार आहेत.
सातारा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. गट, गणांच्या कच्च्या प्रभागरचनेवर हरकती, आक्षेपांवर सुनावणी होऊन काही बदल करून पुन्हा अंतिम प्रभागरचना तयार करण्यात आली आहे. गट व गणाच्या प्रारूप रचनेसाठी 100 हरकती आल्या होत्या. त्यापैकी 67 हरकती फेटाळल्यानंतर 33 हरकतींकरून गट व गणात काही प्रमाणात बदल करून आज ही अंतिम प्रभागरचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये सातारा कारी आणि अंबवडे हा बदल, तर ठोसेघर कारी गणात आले आहे. भोंदवडे, अंबवडे बुद्रूक गणामध्ये गेले आहे.
जावळी : मोरघर कुडाळ गटात, तर सायगाव गणात गेले. खटाव : नांदोशी, जायगाव गणातून औंध गणात. खबालवाडी हे औंध गणातून जायगावात गेले आहे. धोंडेवाडी एनकूळ गणातून निमसोड गणात, निमसोड गणातून माने, तुपेवाडी, एनकूळ गणात गेले, तर हणबरवाडी कलेढोण गणात गेले. खंडाळा : कण्हेरी नायगाव गणामधून बावडा गणात व खेड गटात गेले, तर बावडा गण व खेड गटातील भादवडे नायगाव गण व भादे गटात गेले.
कराड : वाघेरी गणातील शहापूर, कोपर्डे हवेली हे गणात आले आहे, तर भोसलेवाडी उंब्रज गणातून कोर्टी गणात गेले. भुयाचीवाडी हे कोर्टी गणातून इंदोली गणात गेले. पाटण : मरळी गणातील दिवशी बुद्रूक, टेळेवाडी, ओरिवळे, गावे मारूल हवेली गणामध्ये जोडण्यात आली आहेत. मारूल हवेली गणातील चोपदारवाडी सांगवड, चौगुलेवाडी ही मरळी गणाला जोडण्यात आली आहेत.
वाई तालुक्यात सर्वाधिक उलथापालथ
वाई तालुक्यातील जुन्या बोपर्डीऐवजी केंजळ गटात गेले आहे, तर केंजळ क बोपर्डी गण झाला आहे. शहाबाग आणि वाई ग्रामीण हे यशवंतनगर गण बाकधन गटाला जोडण्यात आले आहेत. शहाबाग गण काढून केंजळ गण गट झाले आहेत. बावधन गट आणि यशवंतनगर गणातील पाचवड हे भुईंज गटातील जांब गणाला जोडण्यात आले. जांब गणातील निकमवाडी, किवडी पुनर्वसन, चांदवडी पुनर्वसन ही भुईंज गणात जोडण्यात आली आहेत. भुईंज गणातील मापरवाडी, लगडवाडी ओझर्डे गटात व गणाला जोडण्यात आली आहेत.
झेडपीत महिलांची संख्या वाढणार
या गट, गणांची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. आगामी आठवडय़ात आरक्षण सोडत गट, गणनिहाय काढली जाईल. यामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात गट, गण आरक्षित ठेवले जातील. पहिल्यांदा एससी, एसटीचे आरक्षण काढले जाईल, त्यानंतर भटक्या विमुक्त जातीचे आरक्षण निघेल. त्यानंतर सर्व प्रभागातील महिलांसाठीचे आरक्षण काढले जाईल. यावेळेस ओबीसी आरक्षणाविना निवडणुका होत असल्याने सर्वाधिक मतदारसंघ हे खुले व खुल्या प्रवर्गातील महिलांसाठीच राखीव राहण्याची शक्यता असल्याने जिल्हा परिषदेत महिलांची संख्या वाढणार आहे. मात्र, ओबीसी आरक्षण नसले तरी स्थानिक पातळीवरील पक्ष व आघाडय़ा काही जागांवर ओबीसी उमेदवारांनाही संधी देतील, असे संकेत आहेत.































































