
>> प्रा. सचिन बादल जाधव
मानव आणि निसर्ग यांचा संबंध हा प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. निसर्गातूनच माणसाचा जन्म झालाय आणि याच निसर्गातून माणसाच्या सर्व गरजा पूर्ण होतात. निसर्गात माणसाला आयुष्य जगण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची पूर्तता होऊ लागली. त्यामुळे मनुष्याचे जीवन जगणे सोपे झाले. तसेच या निसर्गातील सर्वात मोठी देणगी म्हणजे झाड. झाडे आहेत म्हणून आज आपण या पृथ्वीतलावर सुखरूप राहू शकतो. कारण या झाडांपासून आपल्याला जीवनावश्यक प्राणवायू मिळतो. माणसाच्या जीवनात झाडांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.
झाड हे आपल्या निसर्गाचा महत्त्वाचा घटक आहे. वृक्ष आपल्या निसर्गाची शोभा वाढवतात. पर्यावरणाला, निसर्गाला झाडांमुळे सौंदर्य प्राप्त होते. वृक्ष आपल्याला जीवनावश्यक सर्व गोष्टी देतात. आपण जर बारकाईने लक्ष दिले असता आपल्याला लक्षात येईल की, मनुष्याचे आयुष्य पृथ्वीवर टिकवून ठेवण्यासाठी वृक्ष किती महत्त्वाची भूमिका बजावतात! जर हे वृक्ष नसते तर आपले जीवन जितके सुरळीत चालले आहे तितके सुरळीत चालले नसते. मात्र भरपूर प्रमाणात वृक्षतोड झाल्याने आपल्या आजूबाजूचे वन क्षेत्र कमी होत चालले आहे. त्यामुळे कडक उन्हाळा, प्रदूषण आणि तापमानवाढ अशा समस्या दिवसेंदिवस उद्भवत आहेत. तसेच झाडांची कमी होत चाललेली संख्या यामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. सोबतच आपले ऋतुचक्रही बदलत चालले आहे. त्यामुळे अशा समस्यांपासून आपल्याला आपला आणि सभोवतालच्या पर्यावरणाचा बचाव करायचा असेल तर वृक्षलागवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वृक्षारोपण करण्याचे भरपूर फायदे आहेत. वृक्ष हे आपल्या पर्यावरणाचा सर्वात महत्त्वाचा घटक आहेत. आपल्या अवतीभोवती असणारी झाडे आपल्याला फक्त प्राणवायूच न देता इतर अनेक गोष्टीही देतात. वृक्षांपासून आपल्याला सावली मिळते. थोडक्यात एकप्रकारचा निवाराच मिळतो. वृक्ष आपले मित्रच आहेत. अनेक लोकांचा उदरनिर्वाह वृक्षांमुळे पूर्ण होतो. काही लोक झाडांची फळे विकून पैसे कमावतात व आपला उदरनिर्वाह करतात.
तसेच आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी झाडे महत्त्वाची ठरतात. झाडांपासून मिळणारा स्वच्छ ऑक्सिजन आणि हवा आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी कारणीभूत ठरते. अनेक वृक्षांमध्ये औषधी गुणधर्म असतात. त्यापासून विविध औषधे बनवली जातात. इतकेच नव्हे तर, अलीकडे प्रदूषण ही सर्वात मोठी समस्या संपूर्ण जगासमोर उभी राहिली आहे. इंधनाच्या ज्वलनामुळे, विविध उद्योगधंद्यांच्या स्थापना करण्यासाठी वृक्षतोड केली जात आहे. त्यामुळे जागतिक तापमानात वाढ होऊन अलीकडे तापमान वाढले आहेत. यामुळे आणि पक्षी आणि प्राणी यांचे जीवन धोक्यात आले आहे. वातावरणात होणारे हे बदल आपल्या सजीवांचे जीवन, अस्तित्व नष्ट करण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात.
अशा परिस्थितीमध्ये आपल्याला योग्य पावले उचलणे गरजेचे आहे. ती म्हणजे जास्तीत जास्त वृक्षारोपण करणे होय. अलीकडच्या काळामध्ये वृक्षारोपण करण्याकडे जास्त भर दिला पाहिजे. अनेक कार्यक्रम, लेखन कविता यांच्या माध्यमातून वृक्षारोपण करणे का गरजेचे आहे हे सांगणे महत्त्वाचे आहे. वृक्षारोपणाचे अनेक छान प्रकल्प अलीकडे राबवले जातात. या प्रकल्पांमध्ये आपण सहभागी होऊन वृक्षारोपण केले पाहिजे. शाळा, महाविद्यालय मुलांना वृक्षांचे महत्त्व पटवून सांगितले पाहिजे, जेणेकरून हे विद्यार्थीसुद्धा वृक्षतोड न करता वृक्षारोपण करतील.
वृक्षारोपण करून वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण कमी करण्यासाठी मदत केली पाहिजे. वृक्षारोपण करण्यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त वृक्षारोपण होईल. वृक्षारोपण हे आपल्या काळाची गरज आहे. त्यामुळे वृक्षाचे महत्त्व जाणून प्रत्येकाने वृक्षारोपण करणे हे गरजेचे आहे.



























































