
मुंबई गोवा महामार्गारील भरणे येथील उड्डाण पूल आणि जगबुडी नदी पूल जंक्शन येथे पडलेले खड्डे हे धोकायक असून हे खड्डे बुजविण्यात आले नाही, तर या ठिकाणी भीषण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकदा इथे प्रत्यक्ष भेट देऊन या जंक्शनची पाहणी करावी किंवा एकदा भीषण अपघात झाला तर त्या अपघाताची पूर्ण जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी वाहनचालक आणि प्रवाशी यांनी केली आहे.
भरणे नाका येथील उड्डाण उलाचे काम तीन वर्षे रखडल्याने येथील व्यावसायिक, पादचारी, वाहनचालक, प्रवाशी यांनी बरच काही सोसलं आहे. इथे होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीमुळे अनेकांना लहानमोठ्या अपघातानाही सामोरे जावे लागले आहे. भरणे उड्डाण पूल वाहतुकीस खुला झाल्यावर येथील व्यावसायिक, प्रवासी वाहन चालक यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र पुलावरून एकेरी वाहतूक सुरू झाल्यावर दिलासा मिळण्याऐवजी वाहन चालक पादचारी आणि प्रवाशांची डोकेदुखी आणखीनच वाढली आहे.
मुंबईकडून गोवा दिशेकडे जाताना भरणे उड्डाण पूल जिथे संपतो. त्याच ठिकाणी जगबुडी पुलाचा अप्रोच रोड सुरु होतो. खेडहून चिपळूणकडे जाणारे वाहने आणि मेहता पेट्रोलपंपाकडून येणार सर्व्हिस रोडवरील वाहने उड्डाण पुलाचा एन्ड आणि जगबुडी नदीपुलाचा अप्रोच रोड या जंक्शनवर एकत्र येतात त्याचवेळी उड्डाण पुलावरून गोव्याकडे जाणारी वाहने भरधाव वेगाने त्याच जंक्शनवर येतात. त्यामुळे इथे वाहतुकीची सतत कोंडी झाल्याचे पहायला मिळते. त्यातच जगबुडी पुलाच्या आणि उड्डाण पुलाच्या अप्रोच रोडला मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या जंक्शनवर भीषण अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या ठिकाणी निर्माण झालेली परिस्थिती अतिशय धोकादायक असल्याने महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी इथे येऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि वाहन चालक, प्रवासी यांना दिलासा द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमित कदम यांनी केली आहे.

























































