
हॉटेलात जाणे, खाणे, पिणे, राहणे या सर्व आता अगदी सामान्य गोष्टी झाल्या आहेत. बऱ्याच लोकांना तर आता पंचतारांकित आणि सप्ततारांकित हॉटेल्सचेदेखील नावीन्य राहिलेले नाही. जमिनीबरोबरच काही हॉटेल्सही पाण्यावरदेखील उभारण्यात आलेली आहेत आणि अनेक लोक त्याचा आनंद लुटत असतात. त्याचबरोबर ‘क्रूझ’ ही संकल्पनादेखील प्रत्यक्षात अवतरली आणि लोकांनी त्यालादेखील भरभरून प्रतिसाद दिला, मात्र आता भविष्यात चक्क हवेमध्ये तरंगणारे, उडणारे, प्रवास करणारे हॉटेल लवकरच आपल्या भेटीला येणार आहे.
हे एक प्रकारचे हवेत उडणारे जहाज असणार आहे. या हवेत उडणाऱ्या या हॉटेलमध्ये स्विमिंग पूल, जिम, शॉपिंग मॉल अशा जबरदस्त सेवादेखील असणार आहेत. एकाच वेळी पाच हजार लोक यात प्रवास करू शकणार आहेत. आता या सर्वांवरून या हॉटेलचा आकार किती असेल याचा अंदाज तुम्हीच करा. या हॉटेलचे वैशिष्टय़ म्हणजे जमिनीवर न उतरता (लॅण्डिग न करता) देखील महिनों महिने हे हॉटेल हवेत उडत राहणार आहे. वीस इंजिन जोडलेले हे हॉटेल जणू आकाशावर राज्य करेल. यात अशा सुविधा असतील की, ज्यामुळे त्याला जमिनीवर उतरण्याची गरज भासणार नाही.
या हॉटेलमध्ये प्रवाशांची ने-आण करण्यासाठी सध्या वापरात असलेली विमाने उपयोगात आणली जातील. ही विमाने सहजपणे या तरंगत्या हॉटेलला जोडली जाण्याची व्यवस्था असेल. ही विमाने या हॉटेलसाठी लागणारी साधन सामुग्री, अन्न, धान्य इत्यादीदेखील पोहोचवण्याची व्यवस्था करतील. हे हॉटेल न्यूक्लिअर एनर्जीवर चालणार असल्याने, हे महिनों महिने आरामात हवेत उडत राहू शकेल आणि मुख्य म्हणजे त्यामुळे प्रदूषणदेखील पसरणार नाही. आर्टिस्ट टोनी होमस्टनने या विशालकाय आणि अद्भुत ‘स्काय क्रूझ’चे डिझाइन तयार केले आहे. हे विनापायलट चालणारे क्रूझ पूर्णपणे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ने कंट्रोल केले जाणार आहे. यात काही बिघाड झाल्यास तो दुरुस्त करण्याच्या सर्व सुविधादेखील आतमध्ये हजर असणार आहेत.
स्पायडरमॅन
























































