मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्या घटली; दिवसभरात 761 कोरोना रुग्ण, तिघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोना रुग्णसंख्या कमी होत असून रविवारी सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्या हजारच्या आत आली. दिवसभरात 761 कोरोना रुग्ण सापडले असून तीन जणांचा मृ्त्यू झाला. दरम्यान, सक्रिय रुग्णांची संख्याही कमी झाली असून सक्रीय रुग्णांची संख्या 7 हजार 671 वर पोहोचली आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांत बीए-4 आणि बीए-5 या कोरोना व्हेरिएंटचे रुग्ण सापडल्यामुळे मुंबई महापालिका सतर्क झाली आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाची रुग्णसंख्या दोन हजारांवर गेली होती. याची दखल घेत मुंबई महापालिकेने गर्दीच्या ठिकाणी मास्क लावण्याचे आवाहन केले होते. मात्र, गेल्या तीन दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या घटली असून ती हजारच्या आत स्थिरावली आहे. दरम्यान, मुंबईत कोरोनामुक्त होण्याचा सरासरी दर हा 98 टक्क्यांवर स्थिरावला आहे तर रुग्णसंख्या दुपटीचा कालावधीही हळूहळू वाढू लागला आहे. सध्या रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून 584 दिवसांवर पोहोचला आहे.

मुंबईत बीए-4 व्हेरिएंटची संख्या वाढतेय
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून ती हजारच्या आत आली असली तरी बीए-4 आणि बीए-5 या वेगाने वाढणाऱ्या कोरोनाच्या व्हेरिएंटची संख्या मात्र वाढत आहे. मुंबईत 60 वर्षांच्या एका महिलेला 16 जून कोरोना झाला. त्यांच्या नमुन्यात बीए-4 चा व्हेरिएंट सापडला. सौम्य लक्षणे आढळली. मात्र, होम क्वॉरंटाईनंतर ही महिला पूर्णपणे कोरोनामुक्त झाली, अशी माहिती पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने आज अहवालात दिली. दरम्यान, राज्यात बीए-4 आणि बीए-5च्या व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या 64 वर पोहोचली आहे. आतापर्यंत मुंबईत 34, पुण्यात 15, नागपूर, पालघर आणि ठाणे येथे प्रत्येकी 4 तर रायगड येथे प्रत्येकी 3 रुग्ण सापडले आहेत.

राज्यात 2 हजार 962 रुग्ण
राज्यात दिवसभरात 2 हजार 962 रुग्ण सापडले तर 6 रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात 3 हजार 918 जण कोरोनामुक्त झाले. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली असून ती 22 हजार 485 वर पोहोचली आहे.