
मुंबई शहर व उपनगरातील उच्चभ्रू नशेबाजांना उच्च प्रतीचे कोकेन उपलब्ध करून देणारा नायजेरियन ड्रग्जमाफिया अमली पदार्थविरोधी कक्षाच्या हाती लागला. पोलिसांनी सांताक्रुझ येथे त्याला 80 ग्रॅम कोकेनसह रंगेहाथ पकडले. 24 लाख अशी त्या कोकेनची किंमत आहे.
सांताक्रुझ पूर्वेकडील एअर इंडिया वसाहत परिसरात एक नायजेरियन ड्रग्जमाफिया येणार असल्याची खबर वांद्रे युनिटला मिळाली. त्यानुसार प्रभारी निरीक्षक संजय चव्हाण, एपीआय सुरेश भोये, श्रीकांत कारकर, गायकवाड व पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला. मिळालेल्या माहितीनुसार नायजेरियन व्यक्ती तेथे येताच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली.
चुकवुमा एन्वायके ऊर्फ प्रिन्स असे त्याचे नाव असून त्याच्याकडील बॅगेची झडती घेतली असता त्यात 80 ग्रॅम कोकेन सापडले. प्रिन्स हा शहर व उपनगरातील उच्चभ्रू नशेबाजांना कोकेनची विक्री करतो असे तपासात समोर आले आहे. तसेच ड्रग्जचा धंदा करणाऱया आंतरराष्ट्रीय टोळीचा तो सक्रिय सदस्य असल्याचे समजते.


























































