
विना नंबरप्लेट वाहन वापरणाऱ्या दुचाकीस्वाराला सापळा लावून पकडल्यानंतर तो अट्टल वाहनचोर असल्याचे समोर आले अन् त्याच्या ताब्यातून शहर परिसरातील तब्बल 9 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने ही कामगिरी केली. आरोपीने या दुचाकी शहरातील लोणीकंद, लोणी काळभोर, कोंढवा, कोथरुड, चंदननगर परिसरातून चोरल्या आहेत.
समाधान गणपत जगताप (28, यवत) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. जगताप हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याकडून चोरीच्या 9 दुचाकी जप्त करण्यात आल्या असून लोणी काळभोर, लोणीकंद, कोथरूड, यवत, कोंढवा, अलंकार, हडपसर पोलीस ठाण्यातील 9 वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
वाहनचोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट सहाचे पथक हद्दीमध्ये गस्त घालत होते. यादरम्यान रेकॉर्डवरील आरोपी जगताप यांच्याकडे विना नंबरप्लेट संशयित दुचाकी असल्याची माहिती पथकाला मिळाली. यानुसार पथकाने जगतापला मांजरी परिसरात सापळा लावून पकडले. त्याच्याकडे गाडीच्या कागद पत्राबाबत विचारणा केली असता तो उडवा उडवीचे उत्तरे देऊ लागला. त्याला पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली. जगतापला अटक करून आणखी तपास केला असता गुन्हे शाखेच्या पथकाने जगतापच्या ताब्यातून चोरीच्या तब्बल 9 दुचाकी जप्त केल्या आहेत.
गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, प्रतीक लाहिगुडे, नितीन शिंदे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.


























































