
राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री पद मिळवून देतो, एक मोठी व्यक्ती आपले काम करेल. 100 कोटी द्या आणि मंत्रीपद मिळवा अशी एका आमदाराला ऑफर देऊन पैसे उकळण्याच्या प्रयत्नात असलेल्या चौघांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे.
रियाज शेख, योगेश कुलकर्णी, सागर संगवई आणि जाफर उस्मानी अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. रियाज शेख याने एका आमदाराला 12 तारखेला संपर्क साधला आणि राज्याच्या नवीन मंत्रिमंडळात मंत्रीपद मिळवून देतो असे सांगितले. एक मोठी व्यक्ती आपले काम करेल. या कामासाठी 100 कोटी द्या अशी ऑफर रियाजने आमदाराला दिली. त्यानंतर 100 ऐवजी 90 कोटींमध्ये काम करू, आता वीस टक्के रक्कम द्या आणि काम झाल्यावर उर्वरित पैसे द्या अशी ऑफर रियाजने दिली. सोमवारी रियाज 18 कोटी घेण्यासाठी ऑबेराय हॉटेलात आला, पण आमदाराने याबाबत पोलिसांना रियाजची तक्रार केली होती. ठरल्याप्रमाणे रियाज हॉटेलात आमदाराला भेटण्यासाठी आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशीसाठी नेले. तपासात रियाजने योगेश कुलकर्णी आणि सागर संगवई यांच्याशी संगनमत करून आमदाराची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाल्याने रियाजला अटक करण्यात आली. त्यानंतर तपासात योगेश, सागर या दोघांसह जाफर उस्मानी याचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे स्पष्ट होताच या तिघांनाही अटक करण्यात आली. या चौघांकडून एकूण सात मोबाईल व सीमकार्ड हस्तगत करण्यात आले.
आमदारांचे बायोडेटा व्हॉट्सअॅप
योगेश कुलकर्णी याने सागर संगवई याच्याशी रियाजची ओळख करून दिली. मग रियाजला सागर म्हणाला की, दिल्लीतील त्याचा माणूस मंत्रीपद मिळवून देईल. त्यासाठी 50 ते 60 कोटी रुपये लागतील. त्यानंतर योगेशने आमदारांचे बायोडेटा रियाजकडून घेतले व ते सागरला व्हॉट्सअॅप केले असे चौकशीतून समोर आले आहे.
सागरच्या प्राथमिक चौकशीतून जाफर उस्मानी याचे नाव समोर आले. सागरचा दिल्लीतला माणूस आहे तो जाफर उस्मानी याच्या संपका&त आहे. जाफर हा दक्षिण मुंबईत राहत असल्याचे कळताच पोलिसांनी जाफरलादेखील पकडले.
























































